नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीत लॉकडाऊन अंशत: शिथील

नव्या नियमावलीसह अनलॉक करत कोरोनाशी लढण्याचा  निर्धार   

Updated: Jul 20, 2020, 07:44 AM IST
नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीत लॉकडाऊन अंशत: शिथील title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : coronavirus कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्यानं वाढत असतानाच अनल़ॉकचा टप्पा सुरु झालेला असतानाही राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आणि त्याचं सक्तीचं पालनही केलं गेलं. नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली यांसारख्या भागांमध्ये याचे पडसाद प्रामुख्यानं पाहायला मिळालं. 

सातत्याने वाढणारा कोरोना बाधितांचा आकडा पाहता काही दिवसांपूर्वी दोन टप्प्यांमध्ये ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली येथे लॉकडाऊनचं अधिक काटेकोर पद्धतीनं पालन करण्याचे आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते. ज्यानंतर आता सोमवारपासून हे लॉकडाऊन अंशत: शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यासाठीची नियमावलीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. 

नवी मुंबईमध्ये एकूण ४२ हॉटस्पॉट वगळता अन्य ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. या नियमांअतर्गत भाजी, धान्य, स्थानिक बाजारपेठा, लहान बाजार आणि दुकानं खुली करण्याची मुभा देण्यात आली आहे. पी 1 आणि पी 2 म्हणजेच सम विषम पद्धतीनं ही दुकानं सुरु करण्यात येणार आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकानं सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. 

लॉकडाऊन शिथिल करण्यात आलं असलं तरीही यामध्ये हॉटस्पॉटमध्ये मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत. या ठिकाणी सुरु असणारा लॉकडाऊन हा ३१ जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. शिवाय येथील नागरिकांनीही लॉकडाऊनच्या नियमांचं बालन करणं बंधनकारक असणार आहे. 

नवी मुंबईत लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत असतानाच ठाणे आणि कल्याण - डोंबिवलीमध्येही असंच चित्र पाहायला मिळणार आहे. कल्याण-डोंबिवलीतल्या कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या क्षेत्रांमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे. पण, त्याव्यतिरिक्त इतर भागांमध्ये मात्र दुकानं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स, मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स वगळता सर्व भाजी मार्केटसह बाजारपेठा आणि दुकानं येथेही पी १, पी २ प्रमाणे म्हणजेच सम-विषम तारखेप्रमाणे सुरू राहणार आहेत. 

कल्याण-डोंबिवलीमध्ये लॉकडाऊनची नवी नियमावली

 

 

दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्यानं वाढत असल्यामुळं आता कोरोनावर मात करण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जाऊ लागली आहेत. सध्याच्या घडीला राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३ लाखांच्याही पलीकडे गेला आहे. तर, एक लाखांहून अधिक कोरोनाबाधितांनी या विषाणूवर मात केली आहे.