मजुरांना पाहून लोको पायलटने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण...

मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर    

Updated: May 8, 2020, 07:04 PM IST
मजुरांना पाहून लोको पायलटने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण... title=

औरंगाबाद : औरंगाबाद येथे आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास  मालगाडीने रेल्वे रुळावर झोपलेल्या १९ मजुरांना चिरडले. त्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ माजली आहे. या अपघाताच्या संदर्भात रेल्वे मंत्रालयाने एक ट्विट केले आहे. मजुरांना पाहून लोको पायलटने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. असं या ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे. या दुर्घटनेत १६ मजूर जागीच ठार झाले आहेत. तर दोघांची प्रकृती गंभीर असून एक मजूर सुदैवाने वाचला आहे. जखमींवर औरंगाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

'सकाळच्या सुमारास काही मजूर रेल्वे रूळावर झोपले आहेत हे लक्षात येताच लोको पायलटने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु बदनापूर-करमाड स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत. ' असं रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

औरंगाबादच्या करमाड येथे शुक्रवारी पहाटे मालवाहू रेल्वेखाली येऊन मृत्यमुखी पडलेल्या १६ मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. तसेच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.