मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. विदर्भातील सात जागांसाठी गुरुवारी ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी सुरू असलेला प्रचार आज संध्याकाळी ५ वाजता संपणार आहे. त्याआधी जास्तच जास्त मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून केला जात आहे. कुठे भव्य पदयात्रा तर कुठे सभा घेत विजयी करण्याचे मतदारांना आवाहन करणार आहेत. राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या प्रचाराचा आजचा दिवस सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा आणि धावपळीचा ठरणार आहे.
शिवसेना -भाजपा युतीची संयुक्त प्रचार सभा लातूरच्या औसा येथे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सभेला उपस्थित राहणार आहेत. या दोन दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे पहिल्या टप्प्याच्या प्रचाराचा शेवट दणक्यात होणार आहे. औसा हा लातूर जिल्ह्यातील तालुका असला तरी तो उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येतो. उस्मानाबाद लोकसभेची जागा ही शिवसेना लढवतेय. तर औसा हा लातूर जिल्ह्यात येत असला तरी तो लातूर लोकसभेच्या सीमेवर येतो. त्यामुळे एकाच सभेतून दोन मतदार संघांचा दौरा आटोपणार आहेत. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची उपस्थिती राहणार आहेत.