विखे पाटलांची प्रथमच काँग्रेसविरोधात उघड भूमिका, हालचालींना वेग

काँग्रेस पक्ष खासगी संस्था झालाय का? असा सवालही राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारलाय

Updated: Apr 25, 2019, 12:34 PM IST
विखे पाटलांची प्रथमच काँग्रेसविरोधात उघड भूमिका, हालचालींना वेग title=

अहमदनगर : काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिल्यांदाच पक्षाविरोधात उघड-उघडपणे भूमिका घेतलीय. पक्ष माझ्यामागे उभा राहिला नाही, अशी मनातील खंत उघड करतानाच 'मी भाजपाचा उघड प्रचार केला, मला कशाची भीती?' असं म्हणत त्यांनी पहिल्यांदाच काँग्रेसला थेट प्रत्यूत्तर दिलंय. 

दरम्यान, शिर्डी लोकसभेत कुणाला मदत करायची यावर मंथन करण्यासाठी विखेंच्या बैठकांचं सत्र सुरू झालंय. गावोगावी विखे समर्थकांच्या बैठका सुरू आहेत. सध्या युतीच्या प्रचारासाठी सुजय विखे पाटील संगमनेरमध्ये आहेत. पक्षसमर्थकांसोबत त्यांची सभा सुरू आहे. 

दुसरीकडे, शिर्डी लोकसभा मतदारसंघात आता राजकीय हालचाली वेगात आहेत. जयंत ससाणे यांच्या समर्थकांनी एकत्र येत आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्याविरोधात बैठक घेतली. या बैठकीला विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. 'आपण भाजपाचा उघड प्रचार केला, त्यात भीती कशाची काँग्रेस पक्ष विरोधी पक्षनेत्याच्या पाठिशी उभा राहिला नाही मग मी माझ्या मुलामागे का उभं राहू नये' असा सवाल विखे यांनी विचारला आहे.

फलकावरून माझे फोटो काढले. काँग्रेस पक्ष खासगी संस्था झालाय का? असा सवाल त्यांनी विचारला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधल्याचं ते म्हणाले. आज राधाकृष्ण विखे पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची शक्यता आहे.