प्रताप नाईक, झी २४ तास, कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघातील पराभव लोकसभा निवडणुकीत राज्यातील सगळ्यात धक्कादायक निकाल ठरला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेचे नवखे उमेदवार धैर्यशील माने यांचं आव्हान होतं. त्यात वंचित बहुजन आघाडीने हाजी अल्लम सय्यद यांना शेट्टींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी किती मतं खाणार याची चर्चा सुरू झाली. याचा अंदाज खुद्द राजू शेट्टींनाही आला होता. त्यामुळेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशीही संपर्क साधला होता.
'बाळासाहेब आंबेडकर यांनी मला सांगीतले होते, मी तुमच्या विरोधात उमेदवार ठेवणार नाही. पण त्यांनी नंतर संपर्क केला नाही. २४ मीस कॉल दिले. ते फार मोठे नेते आहेत. दुस-या एका चळवळीतील नेत्याचा घात व्हायला लागलाय, हे समजत असताना त्यांनी ध्रुतराष्ट्राची भूमीका घेतली', अशी टीका राजू शेट्टी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केली.
राजू शेट्टी यांना १ लाख ४ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला १ लाख २४ हजार मतं पडली.
देशपातळीवर राजू शेट्टी यांनी शेतकरी नेता अशी ओळख निर्माण केली. मात्र स्वतःच्या मतदारसंघातच त्यांना पराभवाचा धक्का बसलाय. वंचित फॅक्टरसह या पराभवाला विविध कारणं आहेत. जातीचं राजकारण, शेट्टींचं ब्राह्मण समाजाबाबतचं वक्तव्य, मतदारसंघात कमी झालेला संपर्क, वारणा पाणीपुरवठा योजनेत घेतलेली भूमिका आणि इचलकरंजीमधील वस्त्रोद्योगाकडे झालेलं दुर्लक्षही कारणीभूत असल्याचं बोललं जातंय.