अमित जोशी, झी २४ तास बीड : भाजपचे मित्र असलेले विनायक मेटे पंकजा मुंडेंवर रुसलेत. बीडमध्ये प्रितम मुंडेंचा प्रचार करणार नाही अशी भूमिका विनायक मेटेंनी घेतलीय. दुसरीकडे त्यांनी भाजपासोबतच असल्याचं सांगितलंय. मेटेंच्या या भूमिकेमुळे मुंडे भगिनींची अडचण झाली आहे.
बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे निवडणुकीच्या रणमैदानात नसले तरी टक्कर धनंजय मुंडे विरूद्ध पंकजा आणि प्रीतम अशीच आहे. काटे की टक्कर असताना गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्तीय अशी ओळख असलेले विनायक मेटेंनी पंकजा मुंडेंशी असहकार पुकारला आहे. बीडमध्ये मुंडे भगिनींचा प्रचार करणार नाही अशी भूमिका विनायक मेटेंनी घेतली आहे.
पंकजा मुंडे सातत्यानं अपमानास्पद वागणूक देत असल्याची सल विनायक मेटेंना आहे. त्यातच जयदत्त क्षीरसागर यांच्याशी त्यांची वाढलेली जवळीक मेटेंना अजिबात रुचलेली नाही. मुख्य़मंत्र्यांनी दिलेल्या जाहीर इशाऱ्याचीही त्यांना परवा नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांना इशाराही दिला होता. 'आले तर सोबत नाही तर स्वतंत्र' असं म्हणत त्यांनी मेटे यांचे नाव न घेता टीका केली. राज्यात भाजपा म्हणजे गोपीनाथ मुंडे, त्यांच्यासोबत जे होते त्यांना आम्ही आमच्यासोबत कायम ठेवलंय. मात्र, बीडमध्ये भाजपा विरोधात अन राज्यात सोबत हे चालणार नाही, यायचे तर सोबत या नाहीतर गरज नाही, जे येतील त्यांना सोबत घेऊन आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जाऊ पण विजय नक्की मिळवू असं म्हणत फडणवीसांनी आपण भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे यांच्या पाठिशी ठाम असल्याचं स्पष्ट केलं होतं.
भाजप सोडणार नाही असं मेटे सांगता आहेत, पण मेटेंना वाऱ्याची दिशा कळते असं म्हणतात. मुंडे भगिनींशी असहकार पुकारून त्यांनी भविष्यातल्या राजकारणाची सोय तर लावली नाही ना अशी चर्चा आता सुरू झाली आहे.