Loksabha 2024 Pune : पुणे... महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. माहिती तंत्रज्ञान उद्योगांचं शहर. शिक्षण आणि रोजगाराच्या निमित्तानं परराज्यातून आलेले लोंढे. गेल्या काही वर्षांत कॉस्मोपोलिटन (Cosmopolitan) बनलेली ही सिटी... काळाच्या ओघात स्वतःचं पुणेरीपण हरवत चाललेलं हे शहर.
पुणे... नागरी समस्यांचं माहेरघर
झोपडपट्ट्यांमुळं वाढलेला बकालपणा, नामचीन गुन्हेगारांचा अड्डा आणि ड्रग्ज निर्मितीची फॅक्टरी ही पुण्याची नवी ओळख बनलीय. ट्रॅफिक जॅम तर पुणेकरांच्या पाचवीलाच पुजलाय. पुणे मेट्रो प्रकल्प (Pune Metro) पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. नदी सुधार प्रकल्पालाही गती मिळालीय. मात्र रिंग रोडची बांधणी, स्मार्ट सिटी प्रकल्प, पुणे - नाशिक रेल्वे मार्ग, आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी, जायका प्रकल्प, चांदणी चौकातील शिवसृष्टी हे महत्वाकांक्षी प्रकल्प अजूनही रखडलेत.
ताज्या आकडेवारीनुसार, 19 लाख इतकी मतदारसंख्या असलेला पुणे लोकसभा मतदारसंघ. त्यातले मराठा, ओबीसी आणि ब्राह्मण हे घटक निवडणुकीच्या राजकारणात प्रभावशाली ठरतात. कधीकाळी काँग्रेसचं (Congress) वर्चस्व असलेला पुणे मतदारसंघ आता भाजपचा (BJP) बालेकिल्ला बनलाय.
पुण्याचं राजकीय गणित
2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी भाजप उमेदवारांना पराभूत केलं. मात्र 2014 मध्ये भाजपचे अनिल शिरोळे यांनी काँग्रेसच्या डॉ. विश्वजीत कदमांना तब्बल 3 लाखांच्या फरकानं धूळ चारली. 2019 मध्ये भाजपनं गिरीश बापटांना मैदानात उतरवलं आणि त्यांनीही काँग्रेसच्या मोहन जोशींचा सव्वा तीन लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला. मार्च 2023 मध्ये गिरीश बापटांच्या निधनानंतर याठिकाणी पोटनिवडणूक झालीच नाही
पुण्यातील 6 पैकी शिवाजीगर, कोथरूड, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट या 4 विधानसभा मतदारसंघात भाजपचेच आमदार आहेत. वडगाव शेरीतून राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे निवडून आलेत. तर गेल्यावर्षी मुक्ता टिळकांच्या निधनांतर झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी आपल्या पॅटर्ननं विजयश्री खेचून आणली. भाजप असो वा काँग्रेस पुण्यामध्ये या दोहोंपैकी कुणाकडेच पक्षावर भक्कम पकड असलेलं नेतृत्व आजघडीला तरी नाही. सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी किंवा पुण्याची ताकद गिरीश बापट या घोषणा आपल्याला आठवत असतील. आज अशी घोषणा देता येईल असं नावही नाही आणि पक्षही नाही.
आता पुन्हा एकदा लोकसभेसाठी काँग्रेसकडून धंगेकर पॅटर्नची चर्चा सुरू झालीय. त्याशिवाय माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आरजे संग्राम खोपडे हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. भाजपमध्ये तर इच्छुक उमेदवारांची मांदियाळीच आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी केंद्रीय पदाधिकारी सुनील देवधर, राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे आणि फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे शिवाजी मानकर अशी लांबलचक यादी आहे. त्याशिवाय देवेंद्र फडणवीसांच्या उमेदवारीचीही पुण्यात चर्चा सुरूय.
काँग्रेसचा धंगेकर पॅटर्न
कसब्यातील धंगेकर पॅटर्न भाजपसाठी त्रासदायक ठरू शकतो. कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवून ब्राह्मण समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपनं केलाय. मनोज जरांगेंचं मराठा आरक्षण आंदोलन हा यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाचा घटक ठरणाराय. पक्षांतर्गत गटबाजी, पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराचे आरोप, अजित पवार आणि चंद्रकांत पाटील या आजी-माजी पालकमंत्र्यांमधला सुप्त संघर्ष हे मुद्देही निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत.
स्थानिक राजकीय मुद्दे तर आहेतच. मात्र मोदी की गॅरंटी विरुद्ध इंडिया आघाडीबद्दलची सहानुभूती अशी खरी लढत यावेळी असणाराय. कधीच एका पक्षाचा बालेकिल्ला नसलेल्या पुण्यात यावेळी कुणाचा झेंडा फडकणार, याची उत्सूकता आहे.