साताऱ्यात कौल कोणाला? महायुतीचं पारडं जड की शरद पवारांचा प्रभाव कायम राहणार?

Satara Loksabha Constituency :  साताऱ्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणाराय. मात्र दोन्ही बाजूनं अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. इथं नेमकं काय राजकीय चित्र आहे, पाहूयात हा पंचनामा सातारा मतदारसंघाचा....

Updated: Mar 21, 2024, 08:32 PM IST
साताऱ्यात कौल कोणाला? महायुतीचं पारडं जड की शरद पवारांचा प्रभाव कायम राहणार? title=

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : सातारा... एकेकाळची मराठ्यांची राजधानी... ऐतिहासिक अजिंक्यतारा म्हणजे साताऱ्याचा मानबिंदू. क्रांतिसिंह नाना पाटलांची ही कर्मभूमी. सातारा (Satara) म्हणजे सैनिकांचा जिल्हा. महाराष्ट्राचं काश्मीर अशी ओळख असलेलं महाबळेश्वर आणि महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण साताऱ्यातलंच. इथली लालचुटूक स्ट्रॉबेरी आणि गोडगोड कंदी पेढे वर्ल्ड फेमस आहेत. मात्र कोल्हापूर, सांगली आणि पुण्याच्या तुलनेत हा जिल्हा बराच मागे पडलाय.

साताऱ्याची पीछेहाट का? 
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या सातारा जिल्ह्याला निसर्गानं भरभरून दिलं. मात्र पर्यटनवाढीसाठी फारसे प्रयत्न झालेच नाहीत. गेल्या 50 वर्षांत कोणताही मोठा प्रकल्प साताऱ्यात उभा राहिला नाही. धरणग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत, एमआयडीसीमध्ये उद्योगांची वाताहत झालीय. तरुण पिढीला शिक्षण आणि नोकरीसाठी पुणे, मुंबई गाठावी लागते. उतारवयात लोक साताऱ्यात स्थायिक होत असल्यानं पेन्शनरांचा जिल्हा अशीही साताऱ्याची ओळख बनलीय.

सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) अभेद्य बालेकिल्ला. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून आतापर्यंत प्रत्येक लोकसभा निवडणुकीत पक्षाचाच खासदार निवडून आलाय. 1999 आणि 2004 मध्ये लक्ष्मणराव पाटील खासदार झाले.

साताऱ्याचं राजकीय गणित
2009 मध्ये उदयनराजे भोसलेंनी (Udayanraje Bhosle) शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधवांचा तब्बल 3 लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा अपक्ष पुरुषोत्तम जाधवांना साडे तीन लाख मतांनी पराभवाचं पाणी पाजलं. 2019 मध्ये शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांचा धुव्वा उडवून उदयनराजेंनी विजयाची हॅटट्रिक केली. मात्र अवघ्या 3 महिन्यात राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला. त्यामुळं विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शरद पवारांच्या भर पावसातल्या सभेनं अख्ख्या महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण बदलून टाकलं. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी भाजपच्या उदयराजेंना तब्बल 87 हजार मतांनी धूळ चारली.

विधानसभेला राष्ट्रवादीचे 2, शिवसेनेचे 2 आणि काँग्रेस-भाजपचा प्रत्येकी 1 आमदार निवडून आला. राज्यात महाविकास आघाडीची स्थापना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधली उभी फूट यामुळं आता राजकारण बदललंय.  सध्या महायुतीकडे 4, तर महाविकास आघाडीकडे 2 आमदार आहेत.

साताऱ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, त्यांचे सुपुत्र सारंग पाटील यांच्यासह कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांचंही नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची चर्चा आहे. दुसरीकडं उदयनराजे भोसले पुन्हा एकदा भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र भाजपनं त्यांना अजूनही झुलवत ठेवलं असल्यानं त्यांचे समर्थक आक्रमक झालेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आ. मकरंद पाटलांचे भाऊ नितीन पाटील आणि शिवसेना शिंदे गटाकडून पुरुषोत्तम जाधवांच्या नावाचीही चर्चा आहे.

सातारा जिल्ह्यात सध्या महायुतीचं पारडं जड दिसत असलं तरी शरद पवारांचा प्रभाव देखील कायम आहे. सातारकरांचं पवारांवर प्रेम आहे. त्यामुळं पवारांच्या उमेदवाराला सहानुभूती मिळू शकते. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीकडून साताऱ्याच्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. कुणाला उमेदवारी मिळते, यावर जिल्ह्याचं राजकारण फिरणाराय. मात्र राजकारणासोबतच विकासासाठी सातारकर मतदान करतील, अशी अपेक्षा आहे..