राष्ट्रवादीच्या या मतदार संघात भाजपला उमेदवार सापडेना!

इतर पक्षातील सक्षम उमेदवार आयात करून त्याला उमेदवारी देण्याच्या दृष्टीनंही भाजपाची चाचपणी सुरु आहे

Updated: Mar 12, 2019, 11:00 AM IST
राष्ट्रवादीच्या या मतदार संघात भाजपला उमेदवार सापडेना! title=

नितीन पाटणकर, झी २४ तास, बारामती : बारामती... पवार कुटुंबीयांची बारामती... त्यामुळं बारामती लोकसभा मतदार संघाला देशपातळीवर ग्लॅमर प्राप्त झालंय. सुप्रिया सुळे या मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, सुप्रिया सुळेंच्या विरोधात कोण? हे अजूनही निश्चित झालेलं नाही. सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी भाजप अजूनही उमेदवाराच्या शोधात आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा झालीय तरीही भाजपला अद्याप बारामतीमध्ये उमेदवार सापडलेला नाही. या मतदारसंघात पुन्हा खासदार सुप्रिया सुळे उभ्या आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार? याची उत्सुकला सगळ्यांना लागलीय. 

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत दुग्धविकास व पशुसंवर्धन महादेव जानकर सुप्रिया सुळेंच्या विरोधातील उमेदवार होते. ही लढत अतिशय चुरशीची झाली. कधी नव्हे ते, सुप्रिया सुळेंचे मताधिक्य लाखाच्या आत आले. फक्त सत्तर हजार मतांच्या फरकाने सुळे विजयी झाल्या. यातून धडा घेत सुळे यांनी मागील पाच वर्षांत मतदार संघातील संपर्क वाढवला. विकासकामे, विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप, महिलांचे कार्यक्रम यातून त्यांनी मतदार संघ पिंजून काढला. तर, दुसरीकडे जानकर यांनी जानकर पाच वर्षात मतदार संघात जवळपास फिरकलेच नाहीत. त्यातच ते पुन्हा बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची चर्चा आहे.

Shiv Sena Stirs Controversy, Says PM Narendra Modi Offered Cabinet Berth to Supriya Sule

त्यामुळं भाजपनं नवीन उमेदवाराची चाचपणी सुरु केलीय. त्यातून, राष्ट्रीय समाज पक्षाचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांचे नाव सुरुवातीला चर्चेत आले. बारामती मतदार संघातील सासर आणि माहेर, उच्चशिक्षित आणि राजकारणाची कोरी पाटी... या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. नंतर मात्र कांचन कुल यांचे नाव मागे पडलं आणि त्यांचे पती आमदार राहुल कुल यांचे नाव सुप्रिया सुळेंच्या विरोधातील उमेदवार म्हणून पुढं आलं. मात्र, ते देखील मागं पडलंय.

इतर पक्षातील सक्षम उमेदवार आयात करून त्याला उमेदवारी देण्याच्या दृष्टीनंही भाजपाची चाचपणी सुरु आहे. बारामती लोकसभा मतदार संघात भाजपनं महादेव जानकर, त्यांच्या आधी कांता नलावडे असे बाहेरचे उमेदवार दिलेत. यावेळी देखील ही परंपरा कायम राहणार का? की सुप्रिया सुळेंच्या विरोधात स्थानिक आणि सक्षम पर्याय भाजपाला मिळणार? याविषयी उत्सुकता आहे. बारामती मधून भाजपचा उमेदवार कोण असणार, यावरच हि लढत लक्षवेधी होणार का... हे ठरणार आहे.