सोलापुरात काँग्रेसकडून शिंदे तर वंचित बहुजन आघाडीकडून आंबेडकरांचा अर्ज दाखल

प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्यांदाच अकोल्याच्या बाहेर उमेदवारी अर्ज दाखल केलाय

Updated: Mar 25, 2019, 03:50 PM IST
सोलापुरात काँग्रेसकडून शिंदे तर वंचित बहुजन आघाडीकडून आंबेडकरांचा अर्ज दाखल title=
डावीकडून सुशीलकुमार शिंदे, जयसिद्धेश्वर स्वामी आणि प्रकाश आंबेडकर

सोलापूर : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये सोलापूर मतदारसंघात तिरंगी लढत रंगणार असल्याचं दिसतंय. इथं काँग्रेसमधून सुशीलकुमार शिंदे, भाजपाकडून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांनी आपला अर्ज दाखल केलाय. लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील दुसऱ्यात टप्प्यात सोलापूरमध्ये मतदान होणार आहे. १८ एप्रिल सोलापूरसह बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या १० मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याआधी शिंदे यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी जिल्हाभरातून कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहण्याचं फर्मान काँग्रेस भवनमधून सोडण्यात आलं होतं. सुशीलकुमार शिंदे यांना अर्ज दाखल करण्यास दीड तासांचा अवधी लागला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांवर बोलण्यास नकार दिला. सुशीलकुमार शिंदे यांच्यापुढे भाजपाच्या डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांचं आव्हान असणार आहे. भाजपने सोलापुरातून विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करत लिंगायत समाजाचे धर्मगुरू जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनीही आज मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रकाश आंबेडकरांसोबत विशाल जनसमुदाय उपस्थित होता. या गर्दीत तरूण, महिला आणि मुस्लीम युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्यांदाच अकोल्याच्या बाहेर उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांची उमेदवारी काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंसाठी अडचणीची होऊ शकते. आजचं शक्तिप्रदर्शन करून प्रकाश आंबेडकरांनी सुशीलकुमार शिंदेंसमोर मोठं आव्हान निर्माण केल्याचं चित्र निर्माण झालंय.