'सीतेचं अपहरण करण्यासाठी रावणही भगव्या कपड्यात आला होता,' नाना पटोलेंची योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका

Nana Patole Compares Yogi Adityanath with Ravav: काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री य़ोगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची तुलना रावणाशी (Ravan) केली आहे. नाना पटोले यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.   

शिवराज यादव | Updated: May 21, 2024, 02:12 PM IST
'सीतेचं अपहरण करण्यासाठी रावणही भगव्या कपड्यात आला होता,' नाना पटोलेंची योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका title=

Nana Patole Compares Yogi Adityanath with Ravav: लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांमधील मतदान पार पडलं आहे. आता फक्त दोन टप्प्यांमधील मतदान शिल्लक आहे. यादरम्यान नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री य़ोगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची थेट रावणाशी (Ravan) तुलना केली आहे. सीतेचं अपहरण करण्यासाठी रावणही भगव्या कपड्यात आला होता असं ते म्हणाले आहेत. यावरुन आता भाजपा नाना पटोले यांच्यावर टीका करत आहे. 

नाना पटोले काय म्हणाले?

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत नाना पटोले म्हणाले की, "मनमोहन सिंग सरकारने अन्न सुरक्षा कायदा आणला होता. या अंतर्गत मोदी सरकार गेल्या दहा वर्षांपासून धान्य वाटप करत आहे. चीनमधून प्लास्टिकचा तांदूळ आणून त्यात भेसळ करून लोकांमध्ये वाटप करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गप्प का आहेत? ते तर भगवे कपडे घालतात, स्वत:ला संत समजतात. आज ज्या प्रकारे चीनने देशाच्या सीमांवर अतिक्रमण करत आहे त्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ का बोलत नाहीत?".

ते पुढे म्हणाले की, "शत्रू देश भारतमातेवर कब्जा करत असताना योगी आदित्यनाथ बोलत का नाहीत? भगवे कपडे घालून अशी गोष्टी बोलत आहेत. पण रावण जेव्हा सीतामातेचं अपहरण करायला आला तेव्हा तोही भगवी वस्त्रे परिधान करून आला होता. भगवा परिधान करून चुकीच्या धोरणांचं समर्थन करणं चुकीचं आहे. हा भगव्या विचारधारेचा अपमान आहे असं आमचं म्हणणं आहे," असं नाना पटोले म्हणाले आहेत.  

भाजपाकडून टीका

नाना पटोले यांच्या विधानानंतर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. भाजपा नेते राम कदम यांनी वारंवार सनातन धर्माचा अपमान केला जात असून, नाना पटोले यांना तुम्ही कोणाला खूश करण्याचा प्रयत्न करत आहात अशी विचारणा केली आहे. "आमच्या सनातन धर्माच्या पवित्र भगव्या रंगाबद्दल वाईट बोलले. ते कोणाला खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत. नेमकं यामागील कारण काय? काँग्रेस नेते वारंवार सनातन धर्माबद्दल अभद्र का बोलत आहेत?", अशी विचारणा राम कदम यांनी केली आहे.

योगी आदित्यनाथांची काँग्रेसवर सडकून टीका

नाना पटोले यांच्या आधी योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी चंदीगड लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार संजय टंडन यांच्या समर्थनार्थ निवडणूक रॅलीला संबोधित करताना काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते की, जेव्हा आपण 400 बद्दल बोलतो तेव्हा काँग्रेसला चक्कर येते. कारण काँग्रेस स्वतः 400 जागांवर निवडणूक लढवत नाही. काँग्रेस रामविरोधी आहे, आम्ही काँग्रेसला सांगतो इटलीतच राम मंदिर बांधा. काँग्रेस विध्वंसाच्या दिशेने चालली आहे आणि बुद्धीविरोधी पक्षही राम मंदिराला विरोध करत आहेत".

"काँग्रेसचे लोक म्हणायचे की राम मंदिर बांधलं तर दंगली होतील, पण मी म्हणालो की दंगल झाली तर उलटं टांगेन. आता उत्तर प्रदेशमध्ये लोकांनी रस्त्यावर नमाज पठण करणं बंद केलं आहे आणि मशिदींमधून लाऊडस्पीकरही खाली येऊ लागले आहेत," असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. जेव्हा जेव्हा देशावर कोणतेही संकट येते तेव्हा राहुल गांधी हे सर्वात पहिले देश सोडतात, त्यांनी नेहमीच देशाला संकट दिले आहे, मग ते नक्षल संकट असो वा दहशतवाद अशी टीकाही त्यांनी केली.