नाशिक दौऱ्यातही पवारांची नेहमीचीच स्टाईल, उमेदवाराबाबत संभ्रम कायम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल दोन दिवस नाशिक जिल्ह्यात तळ ठोकला होता.

Updated: Mar 4, 2019, 10:53 PM IST
नाशिक दौऱ्यातही पवारांची नेहमीचीच स्टाईल, उमेदवाराबाबत संभ्रम कायम title=

योगेश खरे, झी २४ तास, नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल दोन दिवस नाशिक जिल्ह्यात तळ ठोकला होता. या दौऱ्यानंतर पवार पक्षाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करतील किंवा किमान तसे संकेत तरी देतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. पण पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये यावर मौन बाळगलं. उलट नाशिकची जबाबदारी छगन भुजबळांची आहे, असं सांगत त्यांनी संभ्रमात भरच घातली.

नाशिक जिल्ह्याबाबत निर्णय आपणच घेणार, असं पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत सांगितलं होतं. मात्र आता त्यांनी चेंडू भुजबळांच्या कोर्टात टोलवला आहे. मात्र पवारांच्या या दौऱ्यात त्यांचं सारथ्य केलं भुजबळांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी. समीर लोकसभा लढवण्याची तयारी करत आहेत. मात्र पवारांनी आपल्या भाषणात समीर यांचा उल्लेखही केला नाही. त्यामुळे पवारांच्या मनात नेमकं काय आहे, याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब नाहीच. शिवाय दिंडोरीमध्ये माकपाला सोबत घेण्याबाबतही संदिग्धता कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पवार यांच्या दौऱ्याने जिल्ह्यात सुसंवाद वाढण्याऐवजी कार्यकर्त्यांमधली चलबिचलच अधिक वाढली आहे.