महाडकरांना मोठा दिलासा; मदतीसाठी हेलीकॉप्टर दाखल, पाणीपातळी कमी होण्यास सुरूवात

Mahad flood : अतिवृष्टीमुळे महाड शहर आणि जवळच्या गावांमध्ये पूरस्थिती आहे. (Heavy rains in Mahad, Maharashtra ) पुराचे पाणी आणि अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडीमुळे लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.  

Updated: Jul 23, 2021, 08:00 AM IST
महाडकरांना मोठा दिलासा; मदतीसाठी हेलीकॉप्टर दाखल, पाणीपातळी कमी होण्यास सुरूवात title=

अलिबाग : Mahad flood : अतिवृष्टीमुळे महाड शहर आणि जवळच्या गावांमध्ये पूरस्थिती आहे. (Heavy rains in Mahad, Maharashtra ) पुराचे पाणी आणि अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडीमुळे लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. रायगडमध्ये बचाव कार्यासाठी काल हेलीकॉप्टरची मागणी केली होती. आज बचाव कार्यासाठी नेव्हीचे हेलीकॉप्टर दाखल झाले आहे. दरम्यान, महाड शहर आणि परिसरातील पाणीपातळी कमी होण्यास सुरूवात झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. महाडमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे.

पाचाड रस्त्यावर आलेली दरड बाजुला करण्यात यश आल आहे. एनडीआरएफ पथक तळई दरडग्रस्त भागाकडे पोहोचले आहे. हेलिकॉप्टरद्वारे काही वेळात महाडमध्ये बचावकार्य सुरू होणार आहे. लाडवली, परिसरातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. महाडमध्ये मोबाईल आणि अन्य संपर्क यंत्रणा अजूनही ठप्प आहे.

अतिवृष्टीमुळे महाड शहर आणि जवळच्या गावांमध्ये पूरस्थिती आहे. पुराचे पाणी आणि अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडीमुळे लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.  महाडमध्ये विविध भागात लोक अडकले आहेत. महाडच्या तळीये गावात कोसळलेल्या दरडीत 32 घरे बाधीत झाली आहेत. 72 लोक या दरडीत अडकले आहेत. 

दरडी संदर्भातील प्रश्न अद्यापही जैसे थे!

रायगडमधील दरडी संदर्भातील प्रश्न अद्यापही जैसे थेच आहे. 2005 च्या दुर्घटनेनंतरही अजूनही कोणतीच उपाय योजना करण्यात आलेली नाही. 2005 च्या जुलै महिन्यात रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे काही गावात दरडी कोसळल्या होत्या. दासगाव, जुई, कोंडीवते, रोहन या गावात दरडी कोसळून 200 ते 250 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

या दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावांचे भूगर्भ शास्त्रज्ञाच्या तर्फे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर संभाव्य दरडग्रस्त म्हणून रायगड जिल्ह्यातील 103 गावांची यादी तयार करण्यात आली. पण, अजूनही दरडग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न भिजत पडला आहे.