Maharashtra Politics : रत्नागिरीच्या बारसूच्या रिफायनरीवरून (Barsu Refinery) 6 मेला कोकणात धुमशान पेटण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बारसूला जाणार आहेत. त्यामुळे संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. नारायण राणे रिफायनरीला समर्थनाचं नेतृत्व करणार आहेत. तर उद्धव ठाकरे रिफायनरीचा विरोध करण्यासाठी जात आहेत.
उद्धव ठाकरेंचा बारसू दौरा
कोकणातल्या राजापूरमधल्या बारसू रिफायनरीवरून आता राजकीय संघर्ष (Political Crisis) सुरू झालाय. येत्या 6 मे रोजी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बारसूचा दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीच नाणारऐवजी (Nanar) बारसूची जागा रिफायनरीसाठी सुचवली होती. त्यावरून ठाकरेंवर टीकेची झोड उठलीय... तर उद्धव ठाकरेंनी स्वतःवरील आक्षेप फेटाळून लावलेत.
महाराष्ट्रकडे (Maharashtra) राख आणि गुजरातकडे (Gujrat) रांगोळी असा हा प्रयत्न असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मला विरोध करण्यापेक्षा लोकांची बाजू घेऊन प्रकल्पाला विरोध करा असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. लोकांसमोर जाऊन आधी त्या प्रकल्पाचं सादरीकरण करायचं, त्यातून त्यांचे समज-गैरसमज दूर होतील अशी आमची भूमिका होती, पण तूम्ही लोकांचे गैरसमज दूर न करता त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेऊन प्रकल्प राबवताय अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय.
नारायण राणेंचं प्रकल्पाला समर्थन
नेमकं उद्धव ठाकरेंच्या दौ-याच्या दिवशीच रिफायनरीच्या समर्थनार्थ भाजप आणि शिवसेना महायुती मोर्चा काढणाराय. उद्धव ठाकरेंचं हेलिकॉप्टर जिथे लँड होणार आहे, त्याच हेलिपॅडपासून या समर्थन महामोर्चाला सुरुवात होणाराय. त्यामुळं ठाकरे विरुद्ध राणे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत... नारायण राणे स्वतः मोर्चाचं नेतृत्व करणार असल्यानं बारसूत धुमशान रंगणाराय.
आम्ही प्रकल्पाला समर्थन देण्यासाठी बारसूत जाणार आहोत, मला तो प्रकल्प कोकणात हवा आहे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली आहे. दीड लाख कोटी रुपये त्या प्रकल्पावर खर्च होणार आहेत. तरुण-तरुणींना त्या प्रकल्पातून नोकऱ्या मिळणार आहेत. अनेक लहान-मोठे उद्योग सुरु होतील. हॉस्पीटल, कॉलेज असे अनेक उपक्रम सुरु होतील, त्यामुळे हा प्रकल्प कोकणात हवा असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलंय.
रिफायनरीच्या विरोधात बारसू पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन सुरू केलंय. ते नियंत्रणात आणताना स्थानिक प्रशासनाच्या नाकी नऊ आले... आता उद्धव ठाकरेंचा नियोजित दौरा आणि त्याचदिवशी युतीच्या वतीनं काढला जाणारा महामोर्चा यामुळं स्थानिक प्रशासन आणि पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय... ठाकरे आणि राणे गटातर्फे होणारं हे राजकीय शक्तिप्रदर्शन स्थानिकांसाठी खरंच किती उपयोगी ठरेल, याचं उत्तर आता 6 मेलाच मिळणार आहे.