वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) गेल्या आठवड्यात महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. गेल्या 11 महिन्यांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला. 27 जूनला 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे या प्रकरणाची आता सुनावणी होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना देण्यात आल्याने राज्यात शिंदे सरकार सत्तेत कायम आहे. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कोर्टाच्या निकालावरुन भाष्य करत शिंदे गटाला लक्ष्य केले होते. त्यावर आता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील साळवा येथे जल जीवन मिशन अंतर्गत 4 कोटी 32 लाखाच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच गावातील धरणगाव-साळवा रस्त्यावरील पुलाच्या कामाचेही उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
"संजय राऊत हे काय सुप्रीम कोर्टाचे जज आहेत का? झोपेतून उठतात आणि काही पण बोलताच बेछूट आरोप करतात. कर्नाटक निकालावर त्यांचे वर्तन म्हणजे बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना असे आहे. त्यांची ठाण्यामध्ये डोक्याची टेस्ट केली पाहिजे," अशी जहरी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
"लोकांनी आम्हाला गद्दार म्हणून चिडवलं. मी तर 30 नंबर ला गेलो माझ्या आधी 32 जण गेले होते. सत्ता समीकरण बदलण्यासाठी आधीच जळगाव जिल्ह्यातील पाच आमदार गेले होते. त्यापैकी चार आमदार माझ्याही आधी पळून गेले होते. नागपूरचा ही पळून गेला, बुलढाण्याचाही पळून गेला, जळगावचे गेले नाशिकचे गेले, दादर ठाण्याचे सर्वच आमदार शिंदे सोबत पळून गेले. नाशिक ते मुंबई मी एकटाच शिल्लक राहिलो होतो. मी एकट्याने उद्धव ठाकरे सोबत राहून काय केलं असतं? सर्वच शिंदे सोबत पळून गेले चार खांदे गेले तर मी एकटा काय करू? मग माझ्यावरती झाडी डोंगर खोके अशा जहरी टीका होत गेल्या. मी गेलो नसतो तर शिंदे आणि फडणवीस यांच्या माध्यमातून विकास ज्या प्रकारे होत आहे तो महाराष्ट्राचा झाला नसता. मात्र मी एकटाच मूळ ट्रॅकवर आलो आहे," असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
एकनाथ शिंदे सोबत जाऊन मी एक सट्टा खेळलो
"हे मंत्रीपद मला सहज मिळालं नाही. 15 ते 20 वेळा मी जेलमध्ये गेलो होतो. शिंगाडे मोर्चा म्हणून गुलाबराव पाटील हा महाराष्ट्रात फेमस होता. सर्व आयुष्य मी संघर्षात घातलं. त्यावेळेस मी सत्तेची लालसा केली नाही. मी तर मंत्री पद सोडून गेलो होतो, माझी आमदारकीही गेली असती. एकनाथ शिंदे सोबत जाऊन मी एक सट्टा खेळलो हिंदुत्वासाठी मी सट्टा खेळलो. भगवा झेंडा वाचवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत गेलो. आम्ही पक्ष सोडलेला नाही. दुसऱ्या पक्षासोबत गेलेलं नाही. अजूनही शिवसेने सोबतच आहोत. त्यामुळे विरोधकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे," असे गुलाबराव पाटील म्हणाले.