सिंधुदुर्ग : राज्यात युती असली तरी सिंधुदुर्ग शिवसेनेची लढाई भाजपाविरोधातच असल्याचं कुडाळचे शिवसेनेचे वियजी उमेदवार वैभव नाईक यांनी म्हटलं. नारायण राणे आल्यामुळेच भाजपाच्या जागा घटल्याचा टोला नाईक यांनी लगावलाय. विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालत कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक दुसऱ्यांदा निवडून आलेत. त्यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजित देसाई आणि काँग्रेसच्या चेतन मातोंडकर यांचा पराभव केलाय.
गेल्या पाच वर्षात आमदार म्हणून लोकांनी मला स्वीकारले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमची खरी लढाई भाजपशी होती. भाजपने मित्रपक्ष म्हणून काम करताना जिल्ह्यात समजूतीनं भूमिका घेतली नाही. गोव्यातील अनेक मंत्री सिंधुदुर्गात शिवसेनेच्या विरोधात प्रचारासाठी आले होते, असं सांगत 'येणाऱ्या काळात आमचा प्रमुख विरोधीपक्ष हा भाजपचं असेल' असंही वैभव नाईक यांनी म्हटलंय.
यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपावासी झालेल्या राणेंवरही टीका केली. 'नारायण राणे यांच्या पायगुणामुळेच भाजपची वाताहात झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा राणेंना घेऊन खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही. कणकवलीतली आमची राणे विरोधी भूमिका ही उघड भूमिका होती' असंही म्हणत त्यांनी राणेंना टार्गेट केला.
'गेल्या वेळी नीतेश राणेची लढाई ही भाजप सोबत होती गेल्या वेळी १४ हजार मतं होती यावेळी ५५ हजार मतं आहेत. भाजपच्या कुबड्या घेऊन नितेश राणे निवडून आले आहेत. त्यामुळे येणारा काळात कळेल कोण शिल्लक राहत आणि कोण संपतं ते ठरवेल' असं सांगतानाच राणेंना आपला विरोध होता आणि तो कायम राहील, असं वैभव नाईक यांनी स्पष्ट केलंय.