शिवसेनेची साथ सोडणं भाजपाला महागात पडेल - शरद पवार

झी 24 तासला दिली प्रतिक्रिया 

Updated: Oct 26, 2019, 09:19 AM IST
शिवसेनेची साथ सोडणं भाजपाला महागात पडेल - शरद पवार  title=

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकाल समोर आला. शिवसेना-भाजपा कोणता फॉर्मूला वापरणार? मुख्यमंत्री कुणाचा होणार? याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. शिवसेना-भाजपा 50-50 चा फॉर्मूला वापरणार का? अशी देखील चर्चा रंगली आहे. असं असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि यंदाच्या निवडणुकीत 'गेम चेंजर' ठरलेले शरद पवार यांनी महायुतीबद्दल महत्वाचं वक्तव्य केल आहे. 

शिवसेनेची साथ सोडणं भाजपाला महागात पडेल असं शरद पवार म्हणाले आहेत. जनतेनं आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. सेना भाजपाची युती आधीच ठरली आहे त्यामुळे भाजपा सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीची मदत घेणार नाही अशी प्रतिक्रीया शरद पवारांनी झी २४तासशी बोलताना दिली. इव्हीएम घोटाळ्याबाबत बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

फॉर्मुल्याबद्दल उद्धव ठाकरे काय म्हणाले?

 विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तास्थापनेसाठी पडद्यामागे हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपला अवघ्या १०५ जागा मिळाल्यामुळे सत्तास्थापनेसाठी ५६ जागा मिळालेल्या शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. हीच गोष्ट ओळखून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समानसमान सत्तावाटपासाठी आग्रह धरला आहे. कोणत्याही परिस्थितीत फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युलाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, असे त्यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरे म्हटले. 

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना आणि भाजपमध्ये यासंबंधीची बोलणी सुरु असून प्राथमिक स्तरावर समसमान सत्तावाटपाचा प्रस्ताव तयार झाला आहे. या प्रस्तावात मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून घेण्यासंदर्भात कोणताही उल्लेख नाही. मात्र, सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपलाच मुख्यमंत्रीपद मिळू शकते. त्या मोबदल्यात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद, विधानसभेचे अध्यक्षपद आणि केंद्रात आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते.