Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणसंग्राम सुरु झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे कौन बनेगा मुख्यमंत्री? या एका प्रश्नावरुन महायुती आणि महाविकासआघाडीत आरोप प्रत्यारोपांचे वार सुरु झाले आहेत.
महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झालीय पण महायुती आणि महाविकास आघाडीला त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करता आलेला नाही. पण मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण यावरुन महायुती आणि मविआ एकमेकांना आव्हान देऊ लागलेत. उद्धव ठाकरेंनी महायुतीला आव्हान दिल्यानंतर आता फडणवीसांनी शरद पवारांना प्रतिआव्हान दिलंय.
विधानसभा निवडणूक जाहीर झाली तरी महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे ठरलेलं नाही. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यात मविआची जशी अडचण आहे तशी महायुतीचीही अडचण आहे. दोघांनाही आपापले मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर करता आले नाहीत. पण आता महायुती आणि मविआचे नेते एकमेकांना तुमचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असा सवाल विचारु लागलेत. स्वतः मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उद्धव ठाकरेंनी महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असा सवाल विचारलाय.
महायुतीत कुणालाही मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे लागलेले नाहीत. विरोधकांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवण्यापेक्षा विरोक्षी पक्षनेतेपदाचा चेहरा ठरवावा असं प्रतिआव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारावरुन देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांनाच आव्हान दिलंय. शरद पवारांनी मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करावा असं आव्हान फडणवीसांनी दिलंय. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आता तरी दिसत नाही. निकालात निवडून येणाऱ्या आमदारांच्या जोरावर मुख्यमंत्री ठरेल का याबाबत उत्सुकता निर्माण झालीय.
महायुतीच्या 80 टक्के जागांचा तिढा सुटलाय तर 20 टक्के जागांच्याबाबतीत चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हसत खेळत जागावाटपाचा निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी बोलताना व्यक्त केला.
महाविकास आघाडीचं विधानसभेसाठी मुंबईतील जागावाटपाचं सूत्रही ठरल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालीये...ठाकरे पक्षाला मुंबईमध्ये सर्वाधिक 18 जागा मिळणार, काँग्रेसला 14, शरद पवार पक्षाला 2, समाजवादी पक्षाला 1 अशा पद्धतीने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय..