महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या प्रश्नावर अमित शाहा यांचे उत्तर

Amit Shah On Maharashtra CM Post : महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अमित शाहा यांनी मोठं विधान केले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Nov 10, 2024, 08:22 PM IST
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या प्रश्नावर अमित शाहा यांचे उत्तर title=

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडुकीच महासंग्राम शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याबाब उत्सुकता आहे. अशातच महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात बोलताना गृहमंत्री अमित शाहा यांनी मुख्यमंत्रिपदावरून एक मोठं वक्तव्य केलंय. यामुळे राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे. 

मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या उपस्थितीत भाजपनं संकल्प पत्र म्हणजेच जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्यात. मात्र महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नावर बोलताना अमित शाह यांनी घुमजाव केलं. सध्या एकनाथ शिंदे महायुती सरकारचं नेतृत्व करत आहेत. तर निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार, यासंदर्भात तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, असं अमित शाह यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी अमित शाह यांनी सांगलीतल्या शिराळ्यात सभेत फडणवीस यांचं नाव घेत तेच महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री असतील असं सूचक विधान केलं होतं. 

आधी फडणवीस मुख्यमंत्री होतील असं अमित शाह म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, असं शाह म्हणाले खरं... मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असं भाकित झी 24 तासच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात वर्तवलंय. तसंच राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असून, मनसे किंगमेकर राहणार असल्याचंही राज ठाकरे म्हणालेत..  

यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होतेय. महायुतीचे सर्वच नेते सत्तेत येण्याचा दावा करत आहेत. मात्र महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून सुप्त संघर्ष सुरू आहे. तो ऐन निवडणुकीच्या तोंडावर उघड होऊ नये यासाठी मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावरून शाह यांनी घुमजाव केलंय का अशी चर्चा सुरू आहे.