विधानभवनात देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे आले आमने-सामने, पुढे काय झालं पाहा...

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याने वादळी होण्याची शक्यता आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 27, 2024, 02:05 PM IST
विधानभवनात देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे आले आमने-सामने, पुढे काय झालं पाहा... title=

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याने वादळी होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असेल. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन खडाजंगी होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले होते. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी एकाच लिफ्टने प्रवास केला. 

आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले होते. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे लिफ्टने जाण्यासाठी आले असता, देवेंद्र फडणवीसही तिथे उभे होते. यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस लिफ्टसमोर गप्पा मारल्या. यानंतर त्यांनी तळमजला ते तिसऱ्या माळ्यापर्यंत एकत्र प्रवास केला. 

प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे यांना भेटीबद्दल विचारलं असता त्यांनी लिफ्टच्या बाहेर असणाऱ्यांनी विचार करावा असं सूचक विधान केलं. तसंच डोळा मारला का? असं विचारलं असता उद्यापासून गॉगल घालतो असं उपहासात्मकपणे म्हटलं 

दरम्यान याआधी चंद्रकांत पाटील  आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. संसदीय कामकाज मंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील हे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना पुष्पगुच्छ देण्यासाठी आले असता तिथे उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी एकमेकांना बऱ्याच कोपरखळ्या मारल्या. यावेळी सर्वांच्याच नजरा वळल्याचं पाहायला मिळालं. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी अनिल परब यांचं अॅडव्हान्समध्ये अभिनंदन करत आहोत असं सांगत सर्वांच्या नजरा वळवल्या. 

अधिवेशन आहे आणि विधानसभेमध्ये आमदारच असतात आणि त्याच्यामुळे योगायोगानेच आपण म्हटल्याप्रमाणे भेट झालेली आहे. त्याचा कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. ही भेट योगायोगाने झालेली आहे असं भाजपा नेते अतुल भातखळकर म्हणाले आहेत.