Maharashtra Budget 2023: शिंदे सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार 6000 रुपये

Namo Shetkari Maha Saman Yojna: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा केली.

Updated: Mar 9, 2023, 02:32 PM IST
Maharashtra Budget 2023: शिंदे सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार 6000 रुपये title=
Maharashtra Budget 2023

Namo Shetkari Maha Saman Yojna: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेमध्ये सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा केली. यापैकी थेट शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणाऱ्या 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'चाही समावेश आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रती वर्षी 6000 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे केंद्राकडून मिळणारे 6000 रुपये आणि राज्याकडून मिळणारे 6000 रुपये असे एकूण 12 हजार रुपये आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करताना 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'चे घोषणा केली. "महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता 12000 रुपयांचा सन्माननिधी मिळणार आहे. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारही मदत करणार आहे. राज्य सरकारच्या मदतीमुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार देणार आहे. त्यामुळेच केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये गरजू शेतकऱ्यांना प्रतिवर्ष मिळणार आहेत. राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. या योजनेसाठी 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे," असं फडणवीस यांनी या योजनेबद्दल सांगताना जाहीर केलं.

"पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी शेतक-यांचे पैसेही आता सरकार भरणार. यासाठी सरकारकडून आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार आहे. आधीच्या योजनेत विमा हप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून घेतली जात होती. मात्र यापुढे शेतकर्‍यांवर कोणताच भार राहणार नाही. राज्य सरकार पिक विम्याचा संपूर्ण हफ्ता भरणार आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकार 3312 कोटी रुपयांचा भार उचलणार आहे," असंही फडणवीस यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. "2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्‍यांना योजनेचे लाभ देण्यात येणार आहेत. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले आहेत. या योजनांअंतर्ग 12.84 लाख पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत," असंही फडणवीस यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी महाकृषिविकास अभियानांचीही घोषणा फडणवीस यांनी केली. राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविण्यात येणार आहे. पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत सर्व गोष्टींची काळजी याअंतर्गत घेतली जाणार आहे. तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना राबवल्या जाणार आहेत. तसेच एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील, असं फडणवीस म्हणाले.