अहमदनगर शहरासह 'या' तालुक्याचं नाव बदलणार; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पाडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील दोन शहरांची नावे बदलणार आहे. तसंच, मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार आहेत. राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानंतर लवकरच हे नामांतरण करण्यात येणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 13, 2024, 04:14 PM IST
अहमदनगर शहरासह 'या' तालुक्याचं नाव बदलणार; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय title=
Maharashtra Cabinet Decision on Name Changing of Ahmadnagar To Ahilyadevi Nagar and Velhe To Rajgad Latest News

Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पाडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील दोन शहरांची नावे बदलणार आहे. तसंच, मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार आहेत. राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानंतर लवकरच हे नामांतरण करण्यात येणार आहे. 

अहमदनगरचे नामांतरण

गेल्या कित्येक वर्षांपासून अहमदनगरच्या नामांतराची मागणी होत होती. त्यानंतर आज राज्य सरकारने मंत्रिमंडळात याबाबत निर्णय घेतला आहे. अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 

अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक व संघटनांनी केली होती.  या संदर्भात विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून माहिती मागविण्यात येऊन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाचा ठराव देखील राज्य शासनास प्राप्त झाला होता.  या अनुषंगाने गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस करण्यात आली असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची कार्यवाही महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येईल.

वेल्हे तालुक्याचे नाव राजगड होणार

अहमदनगरबरोबरच पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड असे करण्यास मान्यता देण्यात आली आहे. वेल्हे तालुक्यातच स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आहे. त्यामुळं या नावावरुनच राजगड हे नाव देण्यात आले आहे. वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करावे, अशी मागणी कित्येक वर्षांपासून करण्यात येत होती. वेल्हे तालुक्याचे नाव बदलण्याबाबतचा ठराव उपाध्यक्ष राणजित शिवतरे यांनी मांडला होता. तर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वेल्हे तालुक्याचे नाव बदलून राजगड करावे अशी मागणी केली होती. आजच्या बैठकीत अखेर यावर शिक्कामोर्तब झाला आहे. 

नामांतराच्या या निर्णयाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाने केलेल्या प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे की, राज्य सरकारचा हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. यानिर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे. हा निर्णय होण्यात आमदार संग्राम जगताप, दत्तामामा भरणे, आशुतोष काळे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका बजावली. त्या सर्वांचे तसेच समस्त महाराष्ट्रवासियांचे मी मनापासून अभिनंदन करतो.