राज्यात कोरोनाचे १५,७६५ नवे रुग्ण; आठ लाखांचा टप्पा ओलांडला

राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ७२.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. 

Updated: Sep 1, 2020, 10:55 PM IST
राज्यात कोरोनाचे १५,७६५ नवे रुग्ण; आठ लाखांचा टप्पा ओलांडला title=

मुंबई: राज्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने मंगळवारी आठ लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या २४ तासांत राज्यभरात कोरोनाच्या १५,६७५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ३२० जणांचा बळी गेला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८,०८, ३०६ इतका झाला आहे. तर आतापर्यंत राज्यातील एकूण २४,९०३ लोकांनी आपला जीव गमावला आहे. 

कोरोनामुळे मृत्यू होतच नाही, सर्व मृत्यू नैसर्गिक- प्रकाश आंबेडकर

एका बाजूला रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही तितकेच असणे, ही राज्याच्यादृष्टीने दिलासादायक गोष्ट आहे. आज दिवसभरात राज्यातील १०९७८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ७२.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. 

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४२,११,७५२ कोरोना रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ८,०८,३०६ रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली. एकूण चाचण्यांच्या १९.१९ टक्के चाचण्या पॉझिटिव्ह तर बाकीच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

राज्यात सध्या १ लाख ९८ हजार ५२३ इतक्या रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वाधिक ५४ हजार ८५७ एक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यात २० हजार ८६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर मुंबईत २० हजार ६७ रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय, राज्यभरात १३ लाख ७९ हजार ५१९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३६ हजार २० व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.