कोरोनामुळे मृत्यू होतच नाही, सर्व मृत्यू नैसर्गिक- प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पंढरपुरात विठ्ठल मंदिराबाहेर आंदोलन केले होते. 

Updated: Sep 1, 2020, 07:40 PM IST
कोरोनामुळे मृत्यू होतच नाही, सर्व मृत्यू नैसर्गिक- प्रकाश आंबेडकर title=

मुंबई: कोरोना व्हायरसमुळे लोकांचा मृत्यू होतच नाही. आतापर्यंत झालेले सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. बीबीसी मराठी या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांना तुम्ही धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी इतके आग्रही का आहात, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, सरकार कोरोनाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहे. जर दहा कोटी लोकांमध्ये दोनशे अडीचशे लोकांचा मृत्यू झाला, तर त्यात नवीन काय आहे? यापेक्षा मोठ्याप्रमाणात लोकांचा मृत्यू झाला, तर मी कोरोनाचा प्रभाव मान्य करेल. मुळात कोरोन व्हायरसमुळे मृत्यू होत नाहीत, सर्व मृत्यू हे नैसर्गिकच आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

पंतप्रधान मोदींचाही स्वॅब घ्या, त्यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह येईल- प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पंढरपुरात विठ्ठल मंदिराबाहेर आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी गर्दी झाल्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढतो, हा दावा फेटाळून लावला होता. घाऊक बाजारात दररोज व्यापाऱ्यांची गर्दी होते. यापैकी किती टक्के लोकांना कोरोना झाला हे सांगा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. 

पंढरपुरातील आंदोलनावरुन संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर टीका

यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी थेट कोरोनामुळे मृत्यूच होत नसल्याचा दावा केला आहे. जो माणूस जन्माला आला, त्याचा एक दिवस मृत्यू होणारच. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचा काय पुरावा आहे? शवविच्छेदन अहवालात तसे नमूद करण्यात आले आहे का? त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू होतो, या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही. कारण, मी अनेक माणसांना जगताना बघतोय, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.