तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा १६ वर, ८ जण बेपत्ता

 तिवरे गावातील धरण फुटल्याने झालेल्या दुर्घटनेमध्ये १६ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ८ जण बेपत्ता झाले आहेत. 

ANI | Updated: Jul 4, 2019, 08:03 AM IST
तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा १६ वर, ८ जण बेपत्ता title=

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील धरण फुटल्याने झालेल्या दुर्घटनेमध्ये १६ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ८ जण बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचा आरोप या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. रत्नागिरीच्या तिवरे धरण फुटीची एसआयटीकडून चौकशी होणार आहे, अशी माहिती घटना स्थळाला भेट दिल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. दरम्यान, शिवसेना आमदार चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.

तिवरे धरण दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी नमूद केले आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपयांची मदत राज्य सरकार करणार आहे. तसेच वाहून गेलेली घरे चार महिन्यांत पुन्हा बांधून देणार असल्याचंही महाजनांनी सांगितले.  

दुर्घटनाग्रस्त तिवरे धरणाबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. चिपळूणचे शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण हेच याच धरणाचे ठेकेदार असल्याचं उघड झाले आहे. त्यांच्या खेमराज कन्स्ट्रक्शन कंपनीनं हे धरण बांधले होते. केवळ २० वर्षांत हे धरण फुटल्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्याचं स्पष्ट झाले आहे. तिवरे अपघाताला दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केलीय दापोली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी केली आहे.