close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कोकणातील पाणी अन्यत्र वळवण्याचा सरकारचा घाट - तटकरे

कोकणात येणारे पाणी अन्यत्र वळवण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे. 

Updated: Jun 15, 2019, 10:47 PM IST
कोकणातील पाणी अन्यत्र वळवण्याचा सरकारचा घाट - तटकरे
छाया सौजन्य : खासदार सुनील तटकरे फेसबुक वॉल

अलिबाग : कोकणात येणारे पाणी अन्यत्र वळवण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे. परंतु सरकारचा हा डाव आम्‍ही यशस्‍वी होवू देणार नाही, असा इशारा रायगड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी दिला आहे. ते अलिबागेत पत्रकारांशी बोलत होते. 

कोयना आणि मुळशी धरणातील पाणी कोकणाव्यतिरिक्त अन्यत्र वळवण्यासाठी काय करावे लागेल यासाठी शासनाने एक समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. त्‍यानुसार हे पाणी पूर्वेकडे वळवण्‍याचा सरकारचा डाव असल्‍याचा तटकरे यांनी आरोप केला आहे. सरकारच्‍या या भूमिकेमुळे कोकणातील पाण्‍याची समस्‍या तीव्र होईलच. शिवाय येथील जलविद्युत प्रकल्‍प बंद होतील, असा दावाही तटकरे यांनी केला आहे.

'जनशताब्दीला खेड थांबा द्या'

दरम्यान, कोकण रेल्वेवरील जनशताब्दी एक्स्प्रेसला खेड स्थानकात थांबा द्यावा, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केलीय. त्यांनी नवी मुंबईतील कोकण रेल्वेच्या मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. दरम्यान कोकण रेल्वेला जमीन देऊन विस्थापीत झालेल्या प्रकल्पग्रस्तांना रेल्वेतील नोकरीत सामावून घेण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली. 

कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्यासोबत कोकण रेल्वेच्या समस्या तसेच अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली.यावेळी रेल्वेतील सुरक्षा, खेड दिवाणखवटी तसेच कोलाड येथील प्लॅटफाॅर्म्सची उंची वाढवणे, रत्नागिरीतील शिरवली स्थानकावर रेल्वे क्राॅसिंगसाठी ओव्हर ब्रीज बांधणे तसेच गणेशोत्सवासाठी विशेष गाडी सुरू करणे याबाबतचया मागण्या तटकरे यांनी केल्या आहेत.  त्यावर दीर्घ चर्चा करण्यात आली. कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना या प्रकल्पात सामावून घेण्याच्या विषयावरही चर्चा झाली. त्याचसोबत पनवेल-चिपळूण इएमओ रेल्वे सुरू करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.