...तरच जीवनावश्यवक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील- फडणवीस

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसारख्या महानगरांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.

Updated: Mar 24, 2020, 06:24 PM IST
...तरच जीवनावश्यवक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील- फडणवीस title=

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणखी सूक्ष्म पातळीवर उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी म्हटले की, कोरोना प्रतिबंधासाठी आतापर्यंत राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांचे मी स्वागत करतो. मात्र, काही ठिकाणी आणखी तपशिलात जाऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवायचा असेल तर आपल्याला बाजार समित्यांमध्ये आरोग्य सुविधा पुरविण्याची नितांत गरज असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

सध्याच्या घडीला बाजार समित्यांमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांकडे ओळखपत्रे आहेत. मात्र, व्यापारी, वाहतूकदार आणि खरेदीदारांकडे कोणतीही ओळखपत्रे नाहीत. त्यामुळे बाजार समित्यांच्या माध्यमातून त्यांना ओळखपत्रे द्यावी लागतील. यानंतर बाजार समित्यांमध्ये थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आणि स्वच्छतेची व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरून व्यापारी, वाहतूकदार आणि खरेदीदार बाजार समित्यांमध्ये येतील. त्यामुळे भाजीपाला आणि धान्याचा पुरवठा सुरळीत राहील, असे फडणवीस यांनी सांगितले.

सध्या बाजार समित्यांकडे येणारी वाहने पोलिसांकडून अडवली जात आहेत. त्यामुळे हा माल बाजारपेठेत येणे शक्य नाही.  मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसारख्या महानगरांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये चालक-वाहक यांना ओळखपत्रे दिल्यानंतर पोलिसांनाही तशा सूचना देण्यात याव्यात, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.