मध्य रेल्वेने दिली गुड न्यूज, आता कल्याण पुढील प्रवास होणार आणखी सोपा आणि सुकर, जाणून घ्या कसा..

Mumbai Local Train News: मुंबई लोकल आणि गर्दी हे तर ठरलेले समीकरण आहे. मात्र आता ही मध्य रेल्वेवरील ही गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. कारण हि खास आहे. कल्याण ते कसारादरम्यान वाढीव लोकल फेऱ्यांसाठी तिसरी मार्गिका उभारण्याचे काम मध्य रेल्वेने घेतले आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 20, 2023, 03:16 PM IST
मध्य रेल्वेने दिली गुड न्यूज, आता कल्याण पुढील प्रवास होणार आणखी सोपा आणि सुकर, जाणून घ्या कसा.. title=
Maharashtra Kalyan Kasara third line work is 50 per cent done know the details

Mumbai Local Train Update: मुंबईपल्ल्याड वसलेल्या शहरात मोठ्याप्रमाणात लोकवस्ती वाढत आहे. कामानिमित्त मुंबईत येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. कल्याण-डोंबिवली, टिटवाळापासून ते विरार-वसईपासून चाकरमानी मुंबईत नोकरीसाठी येतात. अशावेळी प्रवासाचा एकमेव पर्याय म्हणजे मुंबई लोकल. मुंबई लोकलची व्याप्ती वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. अलीकडेच गोरेगाव-खार सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण झाले. त्यानंतर आता मध्य रेल्वेकडूनही कल्याणच्या पुढील प्रवास आरामदायी व सुखाचा होण्याकरिता प्रयत्न सुरू आहे. 

कल्याण ते कसारादरम्यान तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरु 

कल्याण ते कसारादरम्यान वाढीव लोकल फेऱ्यांसाठी तिसरी मार्गिका उभारण्याचे काम मध्य रेल्वेने घेतले आहे. या प्रकल्पाचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील 73 टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून इतर कामे प्रगतिपथावर आहेत. एकदा हा प्रकल्प पूर्ण झाल्यास कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावरील लोकल सेवा जलदगतीने होणार आहे. मार्च 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. 

कल्याण-कसारा दुहेरी रेल्वे मार्ग असल्याने या मार्गावर एक्स्प्रेस, लोकल आणि मालगाडी असल्याने लोकल प्रवासास अडचणी निर्माण होतात. तसंच, मालगाडीचे इंजिन बंद पडण्याचे प्रकार वाढत असल्याने त्याचा परिणाम लोकल सेवेवर देखील होतो. त्याचबरोबर कल्याणपुढे जाण्यासाठी लोकल रखडत जाते त्यामुळं या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. 

कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका बनवण्यासाठी 2011मध्ये मंजुरी दिली होती. 2020 मध्ये हा प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, भूसंपादनासाठी अडचणी येत असल्याने हा मार्ग रखडला होता. मात्र, आता 75 टक्के भूसंपादन झाले आहे. तिसऱ्या मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या 49.23 हेक्टर जमिनीपैकी सुमारे 35.96 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. आता फक्त 38 टक्के भूसंपादन बाकी आहे. तसंच, या मार्गिकेवरील आठ प्रमुख पुलांपैकी पाच पुलांचे काम सुरू आहे. दोन रोड ओव्हरब्रिज प्रगतीपथावर आहेत आणि इतर कामे सुरू आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गिकेची एकूण लांबी 67.35 किमी असून यासाठी 792.89 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसंच, ही मार्गिका पूर्ण झाल्यानंतर कल्याण, कसारा मार्गावरील लोकल आणि मेल एक्स्प्रेसमधील गर्दी कमी होईल. तसंच, यामुळं प्रवासदेखील वेगवान होईल. सध्या दोन मार्गावर दररोज एकूण 147 लोकल, 71 लांब पल्ल्याच्या आणि सुमारे 20 मालवाहू गाड्या धावतात. तसंच, टिटवाळा, आसनगाव आणि कसारा येथील प्रवाशांचा भार विलक्षणरित्या वाढत आहे, ज्यामुळे या मार्गावर नेहमी गर्दी असते. तिसऱ्या मार्गिकेमुळं गर्दी कमी होण्यास मदत होईल.