महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ

महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली आहे.

Updated: Aug 8, 2020, 08:25 PM IST
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ

मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली आहे. एका दिवसामध्ये कोरोनाचे १२,८२२ रुग्ण सापडले आहेत. तसंच २७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ५,०३,०८४ एवढी झाली आहे. यापैकी १,४७,०४८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे, तर ३,३८,२६२ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या एका दिवसात ११,०८१ रुग्ण घरी सोडण्यात आले. 

राज्यामध्ये कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर हा ६७.२६ टक्के एवढा आहे, तर मृत्यूदर ३.४५ टक्के आहे. राज्यामध्ये आत्तापर्यंत केलेल्या एकूण टेस्टपैकी १९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 

राज्यामध्ये मुंबईत सर्वाधिक १,२२,३१६ कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी ९५,३५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर १९,९१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईमध्ये आत्तापर्यंत ६,७५१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई पाठोपाठ पुणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या १,०९,९८८ एवढी आहे. यापैकी ६६.०८९ रुग्ण बरे झाले आहेत, तर ४१,२६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यामध्ये सध्या पुण्यात सर्वाधिक ऍक्टिव्ह केस आहेत. पुण्यात आत्तापर्यंत २,६३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

मुंबई पुण्याप्रमाणेच ठाण्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या मोठी आहे. ठाणे जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे १,०३,६४२ रुग्ण आहेत. यापैकी ७७,७३७ रुग्ण बरे झाले आहेत, तर २२,९४३ जणांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे २,९६१ जणांचा मृत्यू झाला. मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे सर्वाधिक बळी घेतली आहेत. 

पुण्यामध्ये आजही कोरोनाचे राज्यातले सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. आजच्या एका दिवसात पुणे मनपा क्षेत्रात कोरोनाचे १४५७ रुग्ण आढळून आले, तर ३९ जणांचा मृत्यू झाला. तर मुंबईमध्ये एका दिवसात कोरोनाचे १,३०४ रुग्ण सापडले आणि ५८ जणांचं निधन झालं.