'...तर दोन दिवस उपाशी राहा'; संतोष बांगरांचा शाळकरी मुलांना अजब सल्ला

Santosh Bangar : दोन दिवस जेवू नका, असा अजब सल्ला शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी शाळकरी मुलांना दिला आहे. संतोष बांगर यांच्या या सल्ल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आकाश नेटके | Updated: Feb 10, 2024, 11:10 AM IST
'...तर दोन दिवस उपाशी राहा'; संतोष बांगरांचा शाळकरी मुलांना अजब सल्ला title=

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत असणारे हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार एका व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. कायमच आक्रमक भूमिकेत असणाऱ्या आमदार संतोष बांगर यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिला आहे. आई वडील ऐकत नसतील तर दोन दिवस जेवू नका असा धक्कादायक सल्ला संतोष बांगर यांनी दिला आहे.  चिमुकल्यांना हा अजब सल्ला दिल्याने संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेंत आले आहेत. कळमनुरी विधानसभेतील लाख येथील विद्यार्थ्यांना आमदार संतोष बांगर यांनी हा अजब सल्ला देत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असतात. आता त्यांनी लाख येथील शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना चक्क आई-वडिलांना मलाच मतदान करायला सांगा अन आई वडील मला मतदान करणार नसतील तर दोन दिवस तुम्ही जेऊ नका असं आगाऊ सल्ला आमदार बांगर यांनी दिला. संतोष बांगर हे लाख येथे धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले असता त्यांनी शाळेला भेट दिली. त्यावेळी असा अफलातून सल्ला बांगर यांनी चिमुकल्यांना दिला. आता या सल्ल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे पुन्हा आमदार संतोष बांगर चर्चेत आले आहेत.

काय म्हणाले संतोष बांगर?

"पप्पा म्हणत असतील की दुसरीकडे मतदान करायचं तर दोन दिवस जेवायचं नाही. पप्पा आणि आईने विचारले का जेवायचं नाही तर त्यांना सांगायचे की, आमदार संतोष बांगर यांना मतदान करा तेव्हाच जेवन करु," असे संतोष बांगर म्हणाले. त्यानंतर त्यांना कोणाला मतदान करायचे असे विचारताच विद्यार्थ्यांनी जोरात ओरडून संतोष बांगर असे म्हटलं.

मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर भर चौकात फाशी घेईन - संतोष बांगर

दरम्यान, महिन्याभरापूर्वी आमदार संतोष बांगर यांनी अजब चॅलेंज दिलं होतं. 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर भरचौकात फाशी घेईल, असं चॅलेंज संतोष बांगर यांनी दिलं. याआधीही त्यांनी मिशी काढण्याचं चॅलेंज दिलं होतं.