अजित पवार भाजपात सामील झाल्यास शिंदे गट सत्तेतून बाहेर पडणार? पक्षाच्या प्रवक्त्यांचं मोठं विधान

Shinde Faction on Ajit Pawar: अजित पवार (Ajit Pawar) भाजपात (BJP) सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना शिंदे गटाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Sirsat) यांनी यावर बोलताना त्यांचं स्वागत करु असं विधान केलं आहे. मात्र यावेळी त्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचंही सूचक विधान केलं.  

शिवराज यादव | Updated: Apr 18, 2023, 01:09 PM IST
अजित पवार भाजपात सामील झाल्यास शिंदे गट सत्तेतून बाहेर पडणार? पक्षाच्या प्रवक्त्यांचं मोठं विधान title=

Maharashtra NCP Crisis: अजित पवार (Ajit Pawar) भाजपात (BJP) सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना शिंदे गटाने यावर प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादीत राहायचं नाही, त्यांनी सोडली तर त्यांचं स्वागत करू असं शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी जर अजित पवार भाजपात सहभागी झाले तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असंही ते म्हणाले असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. 

"अजित पवारांकडे लक्ष जाणं, त्यांनी नॉट रिचेबल होणं ही काही नवीन बातमी आहे. असे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड सुरु आहे. पण अजित पवारांची नाराजी आणि सुप्रीम कोर्टातील प्रकरण यांचा काही संबंध नाही. त्यामुळे जर-तरच्या ज्या गोष्टी सुरु आहेत यात काही तथ्य नाही," असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. 

"पार्थ पवारचा निवडणुकीत पराभव झाल्यापासून अजित पवारांच्या नाराजीला सुरुवात झाली. अजित पवारांनी पहाटे घेतलेला शपथविधी हे त्यांच्यावर शेकलं गेलं. अडीच वर्षांनी शरद पवारांनी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी आपणच अजित पवारांना पाठवलं असल्याचा दावा केला होता. पण अजित पवारांनी त्यावर कुठेही स्पष्टीकरण दिलं नव्हतं. पण नाराजीचा हा खेळ असून त्यात अजित पवारांना मोहरा केलं जात आहे," असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.

"अजित पवारांसारखा टायमिंग साधणारा नेता नागपूरच्या सभेत जाऊन चार तास बसतो आणि त्यांना बोलू दिलं जात नाही. याच्या मागील राजकारण कळायला मार्ग नाही. सभेत त्यांना बाजूला करणं हा त्यांचा अपमान आहे", अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

"अजित पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करत होते, तेव्हाही ते फोन उचलत नव्हते असं धनंजय मुंडे यांनी मला सांगितलं होतं. महाविकास आघाडी सत्तेसाठी होती, पण आता ते वेगवेगळे होत आहेत. आपसी बेबनाव आहे. आता त्याचे चित्र आता समोर येत आहे," असंही ते म्हणाले. 
 
"अजित पवार यांना आता राष्ट्रवादीत राहायचं नाही. त्यामुळे जर त्यांनी सोडली तर त्यांचं स्वागत करू. पण राष्ट्रवादी भाजपात जाईल हा अंदाज चुकीचा आहे," असाही दावा त्यांनी केला. 

"महाविकास आघाडीत आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीत राहायचं नसल्याने बाहेर पडलो. मला वाटतं अजित पवार यांना पक्षात हवी तशी मोकळीक मिळत नव्हती. त्यामुळे उद्या जर अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडली तर आम्ही त्यांचं स्वागत करु. पण आम्ही सत्तेत राहणार नाही," असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे.