'म्हणून आम्ही अजित पवारांबरोबर भाजपसोबत गेलो' छगन भुजबळांनी सांगितलं नेमकं काय झालं

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करुन भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या रविवारी अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात सर्वाधिक टीका झाली ती शरद पवार यांचे अगदी मानले जाणारे छगन भुजबळ यांच्यावर. आता छगन भुजबळ यांनी शरद पवारांना का सोडलं याचं कारण सांगितलं आहे. 

अरूण म्हेत्रे | Updated: Jul 10, 2023, 07:42 PM IST
'म्हणून आम्ही अजित पवारांबरोबर भाजपसोबत गेलो' छगन भुजबळांनी सांगितलं नेमकं काय झालं title=

Chagan Bhujbal : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadanvis Government) सहभागी झाल्यानंतर मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी पुण्यामध्ये फुले वाड्यातील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. छगन भुजबळ यांचा या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं. अखिल भारतीय समता परिषद तसेच अजित पवार गटाचे  (Ajit Pawar Group) कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. पुण्यातील फुले वाडा हा आमच्यासाठी ऊर्जा स्थान आहे. समतेच्या आड जो जो येईल त्याच्या विरोधात ही ऊर्जा वापरू असं यावेळी छगन भुजबळांनी सांगितलं. यावेळी पत्रकारांकडून प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. यावर बोलताना मी सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तर देणार, मी पळून जाणार नाही असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

डळमळीत निर्णय घेतले
शरद पवार यांनी नेहमी डळमळीत निर्णय घेतले, निर्णय बदलले, भाजप सोबत जाण्याचा शब्द देऊन तो फिरवला. या सगळ्याचा परिणाम म्हणून आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली भाजप सोबत गेलो असं छगन भुजबळांनी सांगितलं. 2014 पासून भाजपचं सरकार आहे तेव्हा पासून मी मोदी साहेबांच्या विरोधात भांडलो. 2017 ला  मी जेल मध्ये होतो. 2014 ला शरद पवार, जयंत पाटील, अजित दादा यांच्यात एक डील झालं. यानुसार तुम्ही काँग्रेस सोडा, आम्ही शिवसेना सोडतो असं ठरलं. राष्ट्रवादी नेत्यांनी सांगितलं भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार करू असं सांगण्यात आले. पवार साहेबांनी पाठिंबा दिला. पण अचानक शिवसेना बरोबर माहविकास आघाडी स्थापन करण्यात आली. त्यामूळे अजित पवार यांनी पहाटेचा शपथ विधी केला असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला. लढायच तर लढले पाहिजे पण सतत तळ्यात मळ्यात निर्णय होतात, ते योग्य नाही असं छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.

समता परिषद सोडणार नाही.
माझे विचार महात्मा फुले समता परिषदेचे मी ते कदापि सोडणार नाही, आम्ही भाजप सोबत गेलो आहोत, भाजपमध्ये नाही असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. मी वन मॅन आर्मी सारखा लढलो, माझ्या घरावर हल्ला देखील झाला होता. मी डगमगणार नाही
मी ओबीसी साठी काम करत आहे. जो काम करेल त्याच्याकडून काम करून घेणार असंही भुजबळांनी स्पष्ट केलं.

'मीही तेच केलं'
शरद पवार कधी राजीनामा देतात ते आम्हाला सांगत नाही, राजीनामा मागे घेतात ते सांगत नाही ते दिल्लीला काय चर्चा करतात ते आम्हाला माहिती नाही. मुंबईत जाऊन फोन करतो म्हटल्यानंतर मी देखील तेच केलं असं भुजबळांनी सांगितलं. इडी च्या भीतीने तिकडे गेलोय या आरोपत तथ्य नाही. मी ईडी भोगून आल्याचं भुजबळांनी सांगितलं. चव्हाण सेंटर मध्ये पवार साहेब यांनी राजीनामा दिला. तेव्हा मी समोर सागितले सुप्रिया सुळे यांना कार्यध्यक्ष करू म्हणून. माझं ऐकलं नाही. सुप्रिया सुळे याना अध्यक्ष करा हा ठराव केला होता. त्यावेळी जितेंद्र आव्हाड आणि प्रफुल पटेल यांच्यात जोरदार भांडण झाल्याचा गौप्यस्फोटही भुजबळांनी केला.