#राहाणारकीजाणार? : 'ते' 16 आमदार अपात्र ठरणार? उरलेल्या 24 आमदारांचं काय?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) उद्या निकाल सुनावण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात राज्य सरकारचा विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची वैधता, शिंदे गटातील आमदारांची अपात्रता अशा याचिका दाखल आहेत. सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. पण यादरम्यान आणखी एक प्रश्न उपस्थित आहे तो म्हणजे, जर सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांना अपात्र ठरवलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Chief Minister Eknath Shinde) पाठीशी असणाऱ्या 24 आमदारांचं काय होणार? 

शिवराज यादव | Updated: May 10, 2023, 05:39 PM IST
#राहाणारकीजाणार? : 'ते' 16 आमदार अपात्र ठरणार? उरलेल्या 24 आमदारांचं काय? title=

Maharashtra Political Row: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) उद्या निकाल सुनावण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात राज्य सरकारचा विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची वैधता, शिंदे गटातील आमदारांची अपात्रता अशा याचिका दाखल आहेत. सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. पण यादरम्यान आणखी एक प्रश्न उपस्थित आहे तो म्हणजे, जर सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांना अपात्र ठरवलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Chief Minister Eknath Shinde) पाठीशी असणाऱ्या 24 आमदारांचं काय होणार? 

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य काय? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. मात्र शिंदेंसोबत गेलेल्या उर्वरित २४ आमदारांचं काय होणार? याचीही उत्सुकता सगळ्यांना आहे. याबाबत कायदेतज्ज्ञांची भिन्न मतं आहेत.

16 अपात्र? 24 चं काय? 

सुप्रीम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. उर्वरित आमदारांबाबत कोर्टात काहीच सुनावणी झालेली नाही. त्यामुळं केवळ 16 आमदारच अपात्र ठरतील, असं काही कायदेतज्ज्ञांचं मत आहे. तर ज्या न्यायानं आधीच्या आमदारांना अपात्र ठरवलं जाईल, तोच न्याय इतर 24 जणांनाही लागू होईल. त्यामुळं आधीचे आणि नंतरचे असे शिंदेंसोबतचे सगळेच आमदार अपात्र ठरतील, असंही काही कायदेतज्ज्ञांना वाटतं. तिसरीकडं अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला जाण्याचीही शक्यता आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टानं 16 आमदारांना अपात्र ठरवलं तरी सरकारला धोका नाही. सरकारकडे पुरेसं संख्याबळ असल्याचा दावा केला जात आहे. 

सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. घटनापीठाने याप्रकरणी निकाल राखून ठेवला होता. न्यायमूर्ती एम आर शहा १५ मे रोजी निवृत्त होत असल्याने घटनापीठ त्याआधी निकाल देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सुप्रीम कोर्ट आता नेमकं काय निकाल देतं, यावर पुढचं सगळं भवितव्य अवलंबून असणार आहे. निकाल विरोधात गेला तरी सरकार टिकवण्याच्या दृष्टीनं राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

निकाल काय असू शकतो? 

सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांना अपात्र ठरविल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीने राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर नवं सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरु होतील. 

तर दुसरीकडे आमदार अपात्रतेचा निर्णय विद्यमान विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला तर पुढील निवडणुकीपर्यंत शिंदे-फडणवीस सरकार कायम राहण्याची शक्यता आहे. 

ते 16 आमदार कोण आहेत?

1) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार 
3) तानाजी सावंत
4) यामिनी जाधव
5) संदिपान भुमरे 
6) भरत गोगावले
7) संजय शिरसाट
8) लता सोनावणे
9) प्रकाश सुर्वे
10) बालाजी किणीकर
11) बालाजी कल्याणकर
12) अनिल बाबर
13) संजय रायमूलकर
14) रमेश बोरनारे
15) चिमणराव पाटील
16) महेश शिंदे