Ambadas Danve : ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उमेदवारी न मिळाल्याने पक्षाला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याआधी नाराजीमुळे अंबादास दानवे हे शिंदे गटात जाणार असल्याचे म्हटलं जात होतं. मात्र त्यानंतर आता दानवे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर आता भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे?
"माझ्याशी कोणाशी संपर्क केला नाही. माझ्या पक्षप्रवेशाची बातमी देणाऱ्या चॅनेलवर मी मानहानीचा दावा करणार आहे. कारण अशा खोट्या बातम्या दिल्या जात आहे. मी 30 वर्षे जुना शिवसैनिक असून बाळासाहेबांच्या विचारांनी लढणारा आहे. नुसता काम करणारा नाही तर लढणारा आहे. पदे येतात आणि जातात हे मी अनुभवलं आहे. भाजपचे दलाल यामध्ये घुसलेलं आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या कोणत्याही आधार नसलेल्या बातम्या चालवल्या जात आहेत," असे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं.
"मला या सगळ्या गोष्टी करायच्या असत्या तर मी आधीच केल्या असत्या. माझ्या मनात कोणताही विषय नाही. त्यामुळे एखादी निवडणूक येणे मी महत्त्वाचे मानत नाही. या बातम्या माझ्या 30 वर्षांच्या निष्ठेने काम करण्याचा अपमान करणाऱ्या आहेत. नाराज असलो म्हणून काय झालो? भाजप आणि शिवसेनेची 25 वर्षे युती होती. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे विचार एक होतो. मी त्यांच्यासोबत होतो म्हणून मी भाजपमध्ये गेलो का?," असा सवाल अंबादास दानवेंनी केला.
माझं नाव स्टार प्रचारकांच्या यादीत - अंबादास दानवे
"आता मी प्रचारात उतरणार आहे. मागच्या आठवड्यातच 100 गावांचा दौरा केला आहे, मी शिवसेनेचाच प्रचार करणार आहे. माझं नाव स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. चंद्रकांत खैरे आणि माझ्यात कोणतेही मतभेद नव्हते. त्यांनी आणि मीही तिकीट मागितले होते. खैरे साहेब आमच्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. मला महायुतीकडून कोणतीही ऑफर नाही. महायुतीकडे आमच्याविरोधात लढायला उमेदवार सापडलेला नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमच्यातील नाराजी संपली आहे," असंही अंबादास दानवे म्हणाले.
अंबादास दानवे हे पूर्वाश्रमीचे भाजपचे आहेत - रावसाहेब दानवे
दरम्यान, याआधी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अंबादास दानवे यांच्या पक्षप्रवेशाबाबत भाष्य केलं होतं. "अंबादास दानवे हे पूर्वाश्रमीचे भाजपचे आहेत. भाजप आणि अंबादास दानवे यांचे विचार हे वेगळे नाही. ते आता आमच्या पक्षात नाही, ते त्यांच्या पक्षाचे काम करत आहे. त्यांच्याशी थेट संपर्क झाला नाही, पण संभाजीनगरची जागा आम्हाला मिळावी किंवा मित्र पक्षाला मिळाली तर निवडून यावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत," असे रावसाहेब दानवे यांनी म्हटलं होतं.