देवेंद्र फडणवीसांची नाराजी दूर? जाहिरात प्रकरणानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज पुन्हा एकत्र

Maharashtra Politics : राज्याच्या महत्त्वाच्या वृत्तपत्रांमध्ये आलेल्या शिंदे गटाच्या जाहिरातीवरुन मोठा वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. या जाहिरातीवरुन भाजपमध्ये नाराजीचा सूर असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप नेत्यांनीही उघडपणे याबाबत भाष्य केले होते. मात्र आता शिंदे फडणवीस एकत्र येणार आहेत. 

Updated: Jun 15, 2023, 09:18 AM IST
देवेंद्र फडणवीसांची नाराजी दूर? जाहिरात प्रकरणानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज पुन्हा एकत्र title=
(फोटो सौजन्य - PTI)

Maharashtra Politics : राज्याच सध्या जाहिरातीवरुन नाराजी नाट्य सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून ( शिंदे गट ) प्रमुख वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.  शिंदे गटाकडून (Shinde Group) वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावार देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’असा मजकूर छापण्यात आला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजप (BJP) नेते नाराज असल्याची चर्चा राज्यात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याबाबत शिंदे गटाबद्दल अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती.

मात्र आता या नाराजीनाट्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा असताना शिंदे फडणवीस आज एकत्र येणार आहे. पालघरमध्ये आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येणार आहेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालघरमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र येणार आहेत. दोघेही एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार आहेत. गेले दोन दिवस फडणवीस यांनी कानदुखीचं कारण देत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत कार्यक्रमात एकत्र येणं टाळलं होतं. वादग्रस्त जाहिरातीमुळे फडणवीस नाराज असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे कोल्हापुरातील कार्यक्रमाला फडणवीसांनी उपस्थिती टाळल्याची चर्चा होती. मात्र आज दोघेही एकत्र येत असल्याने नाराजी दूर होत वादावर पडदा पडल्याची चर्चा आहे.

काय होतं जाहिरातीमध्ये?

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या शिंदे गटाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरातीवरून भाजपमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा होती. मुख्यमंत्री शिंदे यांना जनतेने 26.1 टक्के तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना 23.2 टक्के लोकांनी पसंती दिल्याचा सर्वेक्षणातील आकडेवारीचा उल्लेख या जाहिरातीमध्ये करण्यात आला होता. राज्यात सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. या सरकारची कामगिरी सर्वेक्षणातून दिसून येत आहे. त्यामुळे शिंदे पुढे वा फडणवीस मागे हा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तर  एकनाथ शिंदे यांना ठाणे म्हणजेच पूर्ण महाराष्ट्र वाटू लागला आहे. मात्र, बेडूक कितीही फुगला, तरी हत्ती होऊ शकत नाही, अशा  शब्दांत भाजप नेते व राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी टिका केली होती.

दरम्यान, जाहिरात वादानंतर आता शिवसेनेच्या वतीनं महत्त्वाचं स्पष्टीकरण देण्यात आलंय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संबंधित जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले होते, असा दावा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत केला. ही जाहिरात हेतूपुरस्सर दिलेली नव्हती, असं सांगतानाच उपमुख्यमंत्र्यांचा फोटो नसणं ही तांत्रिक चूक असल्याचं केसरकरांनी यावेळी सांगितलं.

दुसरीकडे, आज (गुरुवारी) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऊस दर नियंत्रण समिती आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत बैठक होणार आहे. पालघरमधील कार्यक्रम झाल्यावर सह्याद्री अतिथीगृहात राजू शेट्टी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चा होईल. ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या संदर्भात सूचना केली होती. त्याचसोबत दोन टप्प्यात एफआरपी देण्याचा कायदा पूर्ववत करण्याबाबत आजच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत गारपीट, अतिवृष्टी, पीकविम्याची रक्कम तातडीने जमा करण्याची मागणीही केली जाणार आहे.