अजित पवारांच्या PhD वक्तव्यावरुन वाद, वंचित आक्रमक तर मनसेचा इशारा

Maharashtra Politics : पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात केलेल्या एका वक्तव्याने नवा वाद उफाळून आलाय. पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? असे विधान अजित पवार यांनी केलंय.

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Dec 13, 2023, 10:08 PM IST
अजित पवारांच्या PhD वक्तव्यावरुन वाद, वंचित आक्रमक तर मनसेचा इशारा title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी पीएचडी (PhD) करून काय दिवे लावणार ? असं वक्तव्य केल्यानंतर अजित पवार यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय. अजित पवारांना पीएचडीच्या वक्तव्यामुळे टीकेचे धनी व्हावे लागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीने कठोर शब्दांमध्ये अजित पवार यांच्यावर टीका केलेली आहे.

मनसेचा इशारा
उप-उपमुख्यमंत्री महोदय श्री. अजित दादा, पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत असं आपण म्हणालात... दादा, महाराष्ट्र हे राज्य इतर राज्यांपेक्षा वेगळं ठरतं ते शिक्षणाच्या संधींमुळे आणि त्याबद्दलची आस प्रचंड आहे म्हणूनच. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, ह्यांच्यासारख्या अनेकांमुळे महाराष्ट्रात शिक्षणाची कवाडं बहुजनांना खुली झाली. अगदी लोकमान्य टिळकांपासून ते गोपाळकृष्ण गोखलेंपर्यंत प्रत्येकांनी शैक्षणिक संस्था काढण्यावर भर दिला कारण शिक्षणच समाजाच पुनरुत्थान करू शकतं ह्याची जाणीव होती. 

राहिला प्रश्न पीएचडीचा तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः डॉक्टरेट होते आणि त्यांना सचोटीने, संघर्षाने मिळविलेला हा बहुमान हा महाराष्ट्रातील लाखो तरुणांना प्रेरित करतो की एखाद्या विषयात दीर्घ अभ्यास करून पारंगत होऊन, पीएचडी मिळवावी... आणि सारथी, महाज्योती, बार्टी ह्या संस्थांच्या शिष्यवृत्तीचा विषय होता म्हणजे बहुजनांची मुलं उच्चशिक्षित होणार ना... मग महाराष्ट्राचा उप-उपमुख्यमंत्री इतकं बेजबाबदार विधान आणि तेही सभागृहात करूच कसा शकतो ? "मी स्पष्टवक्ता, मी कठोर, मी टग्या..." असं स्वतःला म्हणवून घेतलं म्हणजे महाराष्ट्राने तुमची वाट्टेल ती विधान सहन करायची का? 

तुम्ही स्वतःला टगे म्हणवून घेता. कारण तुमची टगेगिरी खपवून घेणारी व्यवस्था तुमच्या पायाशी आली. पण तुमच्यासारखं नशीब प्रत्येकाचं कसं असणार ? म्हणून शिकून, पीएचडी करून, चांगली नोकरी करून, सचोटीने आयुष्य जगण्याची इच्छा बाळगत महाराष्ट्रातला तरुण-तरुणी राबत असतात... ते ज्ञानाचा दिवा लावत आहेत, त्यामुळे त्यांना तरी तुमच्या टगेगिरीचा प्रसाद देऊ नका, असं मनसेने म्हटलं आहे. 

वंचित बहुजन आघाडीची भूमिका

70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारांना पीएच.डीचा फुल फॉर्म तरी माहीत आहे का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे. पीएच.डी करणे म्हणजे धरणात मुतण्याची भाषा करण्या इतकं सोपं नाहीये. दहावी पास अजित पवारांनी विद्यार्थ्यांचा अपमान केलाय. त्यांचा जाहीर निषेध करतो असं वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सांगण्यात आलंय.