महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा निर्णय; राज ठाकरे थेट म्हणाले... आपण सत्तेत असू

Maharashtra Politics : मुंबईतल्या नेस्को सेंटरमध्ये मनसेचा मेळावा झाला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय. विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंनी एकला चलोची भूमिका जाहीर केलीय. इतकंच नाही तर या मेळाव्यात राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केलीय. 

वनिता कांबळे | Updated: Oct 13, 2024, 10:25 PM IST
 महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा निर्णय; राज ठाकरे थेट म्हणाले... आपण सत्तेत असू  title=

Raj Thackeray : राजगर्जना करत राज ठाकरेंनी विधानसभेसाठी टॉप गिअर टाकलाय. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी 'एकला चलो'ची घोषणा केलीय. येत्या विधानसभेला 'ना युती, ना आघाड्या' म्हणत राज ठाकरेंनी स्वबळाचं रणशिंग फुंकलंय. इतंकच नाही तर निवडणुकीनंतर आपण सत्तेत असू असा आशावादही राज ठाकरेंनी व्यक्त केलाय. मुंबईतल्या नेस्को सेंटरमध्ये मनसेचा मेळावा झाला. त्याठिकाणी राज ठाकरेंनी स्वबळाची घोषणा केलीय.

हे देखील वाचा... दसरा मेळाव्यात गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या पिढीची एंट्री! पंकजा मुंडे म्हणाल्या- 'हा जो गोरा-गोरा...'

निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी कंबर कसली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता येऊ घातलेल्या विधानसभेत राज ठाकरेंनी कुणाच्याहीसोबत न जाता स्वबळाचा नारा दिलाय. लोकसभेला मोदींना मदतीचा हात देणा-या राज ठाकरेंनी आता मोदींवरच टीका केलीये.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचं सख्य सर्वश्रुत आहे. मात्र मोदींवर टीका केल्यानंतर राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची चक्क नक्कल केली. शिंदेंना पुष्पाची उपमा देत राज ठाकरेंनी त्यांची नक्कल केलीय. राज ठाकरेंनी शरद पवारांवरही आजच्या भाषणातून टीकास्त्र डागलंय. शरद पवार नास्तिक असून देवधर्म मानत नाहीत. मात्र मी बोलल्यानंतर शरद पवार मंदिरात हात जोडताना दिसले, असंही राज ठाकरेंनी म्हटलंय.

आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय. राज्यात आरक्षणावरून मराठा-ओबीसी संघर्ष उभा राहिलाय. यावर भाष्य करत राज ठाकरेंनी आपल्या हातात एकदा सत्ता द्या, असा पुनरुच्चार केलाय. जातीआधारित नोकरी देणार नसल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय.

राज ठाकरेंनी नुकताच मराठवाडा आणि विदर्भ पिंजून काढलाय. विधानसभेच्या तोंडावर पदाधिका-यांच्या भेटी घेऊन चाचपणी केली. स्थानिक राजकीय गणितं लक्षात घेता कुठला उमेदवार देणं योग्य ठरणार याचाही आढावा राज यांनी घेतलाय. विधानसभा निवडणुकीत मनसे ताकदीनं उतरला असून आता त्यांनी थेट स्वबळाचा नारा दिलाय. स्वबळाचा नारा देऊन मैदानात उतरलेले राज ठाकरे कुणाला चितपट करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.