संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेला Red, तर श्रीकांत शिंदेंच्या सभेला Green सिग्नल

Maharashtra Politics ठाकरे-शिंदेंची पुढची पिढी पहिल्यांदाच आमनेसामने येणार, पण आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली

Updated: Nov 4, 2022, 05:06 PM IST
संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेला Red, तर श्रीकांत शिंदेंच्या सभेला Green सिग्नल title=

संभाजीनगर : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) एकाच दिवशी एकाच मतदारसंघात शक्तिप्रदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे ठाकरे-शिंदेंचं होमपीच समजलं जाणाऱ्या मुंबई-ठाण्यात नाही तर संभाजीनगर (Sambhaji Nagar) जिल्ह्यातल्या सिल्लोडमध्ये (Sillod) हे शक्तिप्रदर्शन होणार आहे. 7 नोव्हेंबरला अब्दुल सत्तारांच्या (Abdul Sattar) मतदारसंघात शिंदे-ठाकरेंची पुढची पिढी आमनेसामने येणार आहे. पण आदित्य ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र खासदार श्रीकांते शिंदे यांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. 

आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारली
संभाजीनगरमधील सिल्लोड शहरातील आदित्य ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारलीय़. पोलिसांनी यासाठी ट्राफिक जाम असण्याचं कारण दिलं आहे. हा पंधरा फुटाचा रस्ता आहे या ठिकाणी सभा घेता येणार नाही असं कारण पोलिसांनी सांगितलं आहे. त्या पद्धतीची नोटीस पोलिसांनी आयोजकांना बजावलेली आहे आणि सभेसाठी दुसरे ठिकाण सुचवावं अशा पद्धतीच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. 

दरम्यान, आदित्य यांच्या सभेला, आंबेडकर चौक बाह्य रस्त्यावर परवानगी देण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंची सभा महावीर चौकात होणार होती. पण महावीर चौकातल्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. महावीर चौकात रस्ता छोटा असल्यानं ट्रॅफिक जाम होईल, असं कारण देत पोलिसांनी आणि नगरपरिषदेनं परवानगी नाकारली होती. मात्र आता दुसऱ्या ठिकाणी परवानगी देण्यात आलीय.

संभाजीनगरमध्ये पुढच्या पिढीचा सामना
आदित्य सध्या महाराष्ट्र दौरा करतायत, लोकांमध्ये फिरतायत. त्यांच्या सभांना,रोडशोला तुफान गर्दी होतेय. सत्तारांनी डिवचल्यामुळेचे आदित्य ठाकरेंनी त्यांना बालेकिल्ल्यात जाऊन आव्हान देण्याचं ठरवलंय. पण आता सत्तारांनीही श्रीकांत शिंदेंना मैदानात उतरवल्यानं सिल्लोडमध्ये ठाकरे विरूद्ध शिंदेंच्या पुढच्या पिढीचा सामना रंगणार आहे. आता 7 नोव्हेंबरला कोण मैदान मारणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. 

जळगावमध्ये सुषमा अंधारेंच्या सभेला बंदी
दरमयान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या सभेवरही बंदी घालण्यात आली आहे. मुक्ताईनगरमध्ये होणा-या सुषमा अंधारेंच्या आजच्या सभेवर जिल्हाप्रशासनाने बंदी घातलीये. जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने खळबळ उडालीये. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याही महाआरतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारलीये. मुक्ताईनगरमध्ये सुषमा अंधारेंची सभा होणार होती. ज्यावर जिल्हाप्रशासनाने बंदी घातली. आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांनाही त्याचा फटका बसलाय. कारण पाटलांच्या महाआरती कार्यक्रमाला परवानगी नाकारलीये.