Uddhav Thackeray On PM Modi : रशिया आणि युक्रेनचे युद्ध थांबवले ही भाकड कथा जगभरात सांगितली जात आहे. सत्तेची मस्ती दाखवायची असेल तर पेटलेले मणिपूर शांत करुन दाखवा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज दिले आहे. पंतप्रधान मोदी अमेरिकेत चालले आहेत. पण, मणिपूरमध्ये जायचला वेळ नाही म्हणत अनेक मुद्दयांवर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. वरळीत ठाकरे गटाचं राज्यव्यापी पदाधिकारी शिबीर पार पडले.
हिटलर सुद्धा असाच माजला होता. हिटलर अचानक जन्माला नाही आला. त्याने थेट अत्याचाराचे टेंडर काढले नाही. त्याने मीडियाला कंट्रोल केले. यानंतर हळू हळू अत्याचार सुरु केले. हिटलरचे चिन्ह ही स्वस्तिकच होते असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. आम्ही हिंदूच आहोत. तुमच्यामुळे आम्ही काँग्रेससोबत गेलो. अदानी बाबत प्रश्न विचारला तर तुमची बोबडी उडते. 370 कलम काढलं तेव्हा पाठिंबा देणारी शिवसेनाचा होती. 370 कलम काढूनही काश्मिरमध्ये अजून निवडणुका का होत नाही? काश्मिरमध्ये हिंदू सुरक्षित का नाही? याचे उत्तर द्या असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि केद्रीय मंत्री अमिश शाह यांच्या यांना टार्गेट केले.
पंतप्रधान हा देशापेक्षा मोठा नसतो. देशाची ओळख भारत, हिंदूस्थान आणि भारतीय अशी झाली पाहिजे. भारतीयांची ओळख मोदींचा अंध भक्त अशी होता कामा नये.
आमदार चोरुन, खासदार फोडून सत्ता मिळवता येते. पण जीवाला जीव देणारे सोबती माझ्या सोबत आहेत. माझ्याकडे कागदोपत्री काही नाही. शिवसेना हे पक्षाचे नाव ही माझ्याकडे नाही पण हे सोबती माझी ताकद आहे. उद्या जागतीक गद्दार दिन आहे.
घरात येवून फोडाफोडी करत आहेत. आम्ही नामर्दाची अवलाद नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
महिला गुंड तयार झाले आहेत. माता भगिनींवर हात उठले तर हात जागेवर ठेवू नका. हे गद्दारांच्या विचारांचे वारस दार आहेत. गद्दारांच्या फौजेचं नेतृत्तव करण्यापेक्षा निष्ठावंतांचे नेतृत्व मी करतोय याचा अभिमान वाटतोय. मुंबई तोडण्याचे प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. 52 काय 552 कुळे आले तरी मुंबई तोडू शकत नाही
सहन ही होत नाही आणि सांगता ही येत नाही अशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अवस्था आहे.
आमचा एकच बाप आहे. तुमचे किती बाप आहेत ते तुमचं तुम्हाला माहिती. देश बुडाखाली घेणाऱ्या नेत्याचा धिक्कार करुन दाखवा.
गल्लीत गोंधल दिल्लीत मुजरा अस म्हणत उद्ध ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला.