Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे बहीण -भावाला (Pankaja Munde-Dhananjay Munde) इशारा दिला आहे मला बीडमध्ये येऊ दिले नाही तर तुम्हालाही महाराष्ट्रात फिरायचेय हे लक्षात ठेवा असं जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी म्हटलंय. 8 जून रोजी बीडच्या (Beed) नारायणगड इथं होणारी सभा पुढे ढकलली आहे, त्या सभेच्या अनुषंगानेच मी चार जून ची उपोषणाची तारीख जाहीर केली होती. पण सभा पुढे ढकलल्याने मी त्याच्या आधीच उपोषण सुरू करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. बीडच्या केज तालुक्यातील नांदुर घाट इथं झालेल्या दगडफेकीत मराठा समाज बांधव जखमी झाले आहेत. या जखमी कार्यकर्त्यांची जरांगे पाटील यांनी बीड जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
बीडमध्ये जो प्रकार सुरू आहे तो आता निवडणुकीनंतर होणं मला अपेक्षितच होते. मराठा मताची यांना गरज आहे, पण मराठा समाज बांधवांची नाही, त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या नेत्यांनी हि बाब लक्षात घ्यायला पाहिजे. मलाही आता धमक्या येत आहेत, तुझ्याकडे बघून घेऊ तुला जीवे मारू असं म्हटले जात आहे. मला बीडमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही असे देखील म्हटलं जात आहे, पण मुंडे बहीण भावाने एक लक्षात घ्यावे मला बीडमध्ये जरी येऊ दिले नाही तर त्यांनाही महाराष्ट्रात फिरायचे आहे. माझा लढा माझ्या समाज बांधवांसाठी आहे. त्यासाठी माझी बलिदानाची देखील तयारी असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे
जरांगे पाटील यांचा गौप्यस्फोट
त्याआधी मनोज जरांगे यांनी एक गौप्यस्फोट केला. मी कुणालाही मॅनेज होत नाही, मला पद नकोय. मराठा समाज हेच माझ्यासाठी सर्वात मोठं पद असल्याचं सांगत मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आजपर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केलाय. लोकसभा निवडणुकीत मला खासदार होण्याची संधी होती. कोणताही राजकीय पक्ष माझ्या विरोधात उमेदवार द्यायला तयार नव्हता. राजकीय पक्षांनी माझ्या विरोधात उमेदवार जरी दिला असता तरी ते पक्ष त्यांच्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यायला तयार झाले होते. मात्र मराठा समाज हेच माझ्यासाठी सर्वात मोठं पद असल्यानं मी खासदारकीवर लाथ मारल्याचा गौप्यस्फोट जरांगे यांनी केला. ॉ
मनोज जरांगे उपोषण करणार
मनोज जरांगे पाटील अंतरवाली इथं उपोषण सुरु करणार आहेत. सगेसोयरेसाठी पुन्हा हे उपोषण असल्याचं त्यांनी सांगितलं. मोदी महाराष्ट्रात इतक्या सभा घेत नव्हते पण यावेळी त्यांना मराठ्यांमुळे जिल्ह्यात सभा घ्याव्या लागल्या. मोदी हे गोधड्या टाकूनच महाराष्ट्रात होते. ही वेळ फडणवीस आणि त्यांच्या चार-पाच जणांमुळे आली. आम्ही भाजप विरोधी नाही असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं. सगेसोयरे आणि ओबीसी मराठा एकच असल्याचा जर अध्यादेश नाही काढला तर येणारी विधानसभा निवडणूक लढवणार, पण जर सरकारने मान्य केले तर आम्ही राजकारणात पडणार नाही असंही जरांगे पाटील यांनी सप्ष्ट केलं.