Pune News Today: उन्हाच्या तीव्र झळांमुळं नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच पाणीसाठ्यातही झपाट्याने घट होत आहे. धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. पाणी संकटाची चाहूल लागली असतानाच पुणे महापालिकेने आत्तापासूनच मोठी पावलं उचलली आहेत. पालिकेने पाणी टंचाईसाठी काही नियमावली जारी केल्या आहेत.
देशात मोठ्या प्रमाणात पाणीसंकट तीव्र होत चालले आहे. बेंगळुरुनंतर महाराष्ट्रातील बहुतांश भागात पाण्याची टंचाई आहे. धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे. आत्ताच समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील धरणातील पाणीसाठा 32.72 टक्क्यांनी कमी झाला आहे. तर, पुण्यातील चार मोठे धरणं खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव यात गतवर्षी 12.91 टीएमसी पाणीसाठा होता. मात्र, या वर्षी या चार धरणांत 10.31 टीएमसी पाणीसाठा आहे.
महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षीच्या तुलनेने यंदा कडक उन्हाळा आहे. तसंच, पावसानेही यंदा ओढ दिली होती. त्याचाच परिणाम म्हणजे धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. महाराष्ट्रातील 138 मोठ्या धरणातील पाणीसाठा फक्त 32.72 टक्के इतका आहे. धरणातील पाणीसाठा कमी होत असताना आणि तीव्र जलसंकट असताना पुणे महानगरपालिकेने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
पालिकेने काही नियमावली जारी केल्या आहेत. त्यानुसार, कार वॉशिंग सेंटरने पालिकेने दिलेले पाणी गाड्या धुण्यासाठी न वापरण्याचे निर्देश दिले आहेत. पीएमसीने सीवेज ट्रिटमेंट प्लांटचे पाणी बांधकाम कामांसाठी वापरण्याच्या सूचनाही जारी केल्या आहेत.
महाराष्ट्रात एकूण 138 मोठी धरणे असून त्यापैकी 17 पूर्णपणे कोरडी आहेत; 23 मध्ये 10% पेक्षा कमी पाणीसाठा आहे; 20 मध्ये 50% पेक्षा जास्त पाणीसाठा आहे. त्यानंतर उर्वरित धरणांमध्ये 20 ते 40 टक्के पाणीसाठा आहे.
राज्यातील विविध विभागात पाण्याची परिस्थिती काय?
राज्यातील विविध विभागात पाण्याची खालावत चाललेली पातळी हा चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात सर्वात कमी 19.36 टक्के इतका पाणीसाठा आहे. पुणे विभागानंतर 36.34 टक्के तर, नागपूर विभागात 48.84 टक्के, अमरावती विभाग 49.62 टक्के, नाशिक विभाग 38.17 टक्के आणि कोकण विभागात 50.50 टक्के इतका पाणीसाठा आहे.
पाणी टंचाईची भीषण परिस्थिती असताना टँकरची मागणी वाढत चालली आहे. गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सुस, महाळुंगे, पिसोळी, होळकर वाडी, फुरसुंगी, उरुळी आणि कातारी या भागातील पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी पीएमसी सध्या 34 पैकी 11 गावांना 300 पाण्याचे टँकर आणि उर्वरित 23 गावांना 800 पाण्याचे टँकर वितरित करत आहे.