'तो' पुन्हा आलाय....; राज्यातील 'या' भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain News : पावसानं दडी मारली म्हणता म्हणता आता हाच पाऊस पुन्हा एकदा परतल्याच्या खुणा अगदी स्पष्टपणे दिसू लागल्या आहेत. पाहा हवामान खात्याचं याबाबत काय म्हणणं...   

सायली पाटील | Updated: Aug 2, 2023, 07:10 AM IST
'तो' पुन्हा आलाय....; राज्यातील 'या' भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट  title=
Maharashtra rain Update 2023 Weather Imd Predicted Heavy Rainfall for Next Four Days

Maharashtra Rain News : ऑगस्ट महिन्यात सरासरीहून कमी पाऊस असणार अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती. त्याच धर्तीवर राज्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर कमी झाल्याचंही पाहायला मिळालं. ज्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा काही भागांमध्ये पाऊस जोर धरताना दिसणार आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात बुधवारपासून पुन्हा एकदा काही भागांमध्ये काळ्या ढगांचा खेळ सुरु होणार असून, मध्यम ते तुरळक स्वरुपाच्या सरी बरसणार आहेत. 

बदलणाऱ्या पर्जन्यमानामागचं कारण काय? 

एकिकडे हवामान विभागाकडून पाऊस कमी होणार अशी शक्यता वर्तवण्यात आलेली असतानाच एकाएकी पावसासाठी पूरक वातावरण तयार होताना दिसलं आणि हवामान विभागही सतर्क झाला. या धर्तीवर कोकण पट्ट्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पावसाचा रायगड, रत्नागिरी भागाला सर्वाधिक फटका बसणार आहे. तर, तिथे सिंधुदुर्गातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार दिवसांणध्ये ठाण्यासह पालघरमध्येही ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यामुळं पाऊस खऱ्या अर्थानं परतलाय असंच म्हणावं लागेल. 

राज्यातील घाटमाथ्यांवरही पावसाचं प्रमाण समाधानकारक असेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. तिथे सातारा आणि कोल्हापूरात आठवड्याच्या शेवटाकडे पावसाची शक्यता आहे. त्यामुळं पावसाळी सहलींसाठी तुम्हाला एकदम कमाल वातावरण मिळेल हे आता जवळपास स्पष्टच झालं आहे. 

हेसुद्धा वाचा : राष्ट्रवादी पक्ष फुटला तरी शरद पवार आणि अजित पवार हे एकच? काका-पुतण्याच नेमकं चाललयं तरी काय?

 

धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा 

इथं पावसानं जुलै माहिना गाजवल्यामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधारनकारक पाणीसाठा असल्याची माहिती यंत्रणांनी दिली आहे.   पुढील आठवड्याभराच्या आढाव्यानंतर पाणीसाठ्याची पातशी अशीच राहिल्यास शहरात लागू असणारी 10 टक्के पाणीकपात मागे घेतली जाऊ शकते. तर, ठाणे जिल्ह्यासाठीही आनंदाची बातमी आहे. कारण, बदलापूरमध्ये असणारं बारवी धरण 100 टक्के भरलं आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण पूर्ण क्षमतेनं भरले असून, दुपारी बाराच्या दरम्यान धरणातील 11 पैकी 8 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून, धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.