Sharad Pawar And Ajit Pawar Group : राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष फुटला आहे. सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी फाळणी झाली आहे. मात्र, पवारसाहेब आणि अजितदादा हे एकच आहेत, वेगवेगळे नाहीत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते. अजित पवारांच्या वक्तव्यामुळं त्याला दुजोरा मिळाला आहे. यामुळे राजच्या राकारणात नेमकं चाललयं तरी काय? असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे.
साहेब आणि मी तेव्हाही वेगळे नव्हतो आणि आजही नाही... असं अजित पवार म्हणाले. जाहीर कार्यक्रमात अजित पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. शिरूरचे माजी आमदार दिवंगत बाबुराव पाचर्णे यांच्या स्मारकाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमात विधानसभा निवडणूक प्रचाराचा किस्सा अडित पवार यांनी सांगितला.
राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, या घटनेला जवळपास महिना होत आला आहे. अजित पवार समर्थक आमदारांसह भाजप सरकारमध्ये पर्यायानं एनडीएमध्ये सामील झाले. पवारांनी सोबत यावं, म्हणून ते दोनवेळा मंत्री आणि नेत्यांसह काकांना भेटले. मात्र पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. विरोधी इंडिया आघाडीच्या बैठकीलाही पवार हजर राहिले.
काका-पुतण्यांच्या या लढाईत राष्ट्रवादीची शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी फाळणी झाली आहे. मात्र एवढे राजकीय वाद होऊनही परिवार म्हणून आम्ही एकच आहोत, असा दावा अजित पवारांनी पुन्हा एकदा केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पडली असली तरी साहेब आणि दादा राजकीयदृष्ट्याही एकच असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. गेल्याच आठवड्यात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट गाजली. जयंत पाटलांनी तटकरेंना मारलेली मिठी लक्षवेधी ठरली. हे कमी म्हणून की काय अर्थमंत्रिपद मिळालेल्या अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधीचा वर्षाव केला. त्यात जयंत पाटलांच्या मतदारसंघात भरघोस निधी दिला गेल्याचं बोललं जातंय.
मंगळवारी पंतप्रधान मोदींना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार दिला गेला, त्यावेळी शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. पवारांनी मोदींच्या सत्काराला जाऊ नये, अशी मविआ नेत्यांची इच्छा असतानाही पवार कार्यक्रमाला हजर राहिले. नाही म्हणायला अजित पवारांनी कार्यक्रमात शरद पवारांना भेटणं टाळलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांशी हस्तांदोलन केलं. मात्र अजितदादांनी पाठीमागून जाणं पसंत केलं. आदर करतो म्हणून मागून गेलो असा खुलासा अजित पवार यांनी केला. पवार काका-पुतण्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, याचा थांगपत्ता कुणालाच लागेनासा झाला आहे. साहेब आणि दादा एकच आहेत की कसे, याचा उलगडा होण्यासाठी निवडणुकांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.