मुंबई: राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाची संतधार बघायला मिळते. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे तर काही ठिकाणी पावसाची (monsson news) तीव्रता खूपच अधिक आहे. त्यातच राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान उद्या भारत देश 75वा स्वातंत्र्य दिवस (independence day) साजरा करणार आहे. परिणामी पुढचे दोन दिवस पाऊस असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. यामुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना उद्या करावा लागण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील काही भागात दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी असला तरी दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस कायम आहे. उद्या सोमवारी म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देखील राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर विशेषता घाटमाथ्यावर उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यात पावसाची शक्यता
कोकणातील मुंबई, पालघर, ठाणे खानदेश विभागातील जळगाव पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अकोला, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये उद्या हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात बहुतांशी धरणे फुल भरली आहेत. पुणे जिल्ह्यातील 18 धरणे शंभर टक्के भरले असून या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. यामुळे नदीकाठी वसलेल्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.