Maharashtra School Closed: राज्यात पावसाचा कहर! ठाणे, पालघरसह 'या' जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुटी जाहीर

Maharashtra School Closed: अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jul 25, 2024, 12:09 PM IST
Maharashtra School Closed: राज्यात पावसाचा कहर! ठाणे, पालघरसह 'या' जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुटी जाहीर  title=
अतिवृष्टीमुळे ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी (फाईल फोटो; सौजन्य-PTI)

Maharashtra School Closed: मुंबईसह उपनगरात पावसाने कहर केलाय. रात्रीपासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. यामुळे लोकल ट्रेनवर परिणाम झालाय. दरम्यान ठाणे, पालघरमधील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याकडून पालघर जिल्ह्यातील काही भागात अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे पालघर जिल्ह्यातील वाडा विक्रमगड तालुक्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन 

गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. पुण्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून त्यांनी चर्चा केली. यावेळी जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव आणि मदतकार्याच्या तयारीचा आढावा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. गरज पडताच नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनीही पावसाचा जोर कमी होईपर्यंत आवश्यक ती काळजी घेण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

रायगडमध्ये शाळांना सुटी जाहीर 

रायगड जिल्ह्यातील सर्वच शाळा, महाविद्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. सावित्री, कुंडलिका आणि अंबा या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. यानंतर ग्रामीण भागात पूरस्थिती गंभीर होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. बदलत्या गंभीर परिस्थितीत रायगड जिल्हा प्रशासनाने सुधारित निर्णय जाहीर केलाय. यापूर्वी काही तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.  आता जिल्ह्यातील सर्वच शाळा आज बंद राहणार आहेत.

3 नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी 

रायगडच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस कोसळतो.रायगडमध्ये तीन नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे.महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, रोहा , पोलादपूर तालुक्यातील शाळा , महाविद्यालयांना सकाळीच सुटी जाहीर करण्यात आली होती.अंबा, सावित्री कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश दिले आहेत.