Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर आता ऑगस्ट महिना संपायला आला तरी पाहिजे तसा पाऊस पाहायला मिळत नाही. त्यामुळे पावसाने राज्यात विश्रांती घेतली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढेच नव्हे तर ऑगस्टमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाळावरही चिंतेच्या रेषा उमटल्या आहेत.
दुसरीकडे राज्यात मागील 2 ते 3 दिवसात पाऊस पडल्याचे दिसून आले. मराठवाडा, कोकण, मुंबई आणि विदर्भातील अनेक ठिकाणी पाऊस पडला. त्यातच आता विदर्भ, कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या उर्वरित दिवसांत राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
सप्टेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 8 ते 21 सप्टेंबरपर्यंत राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.
सद्यस्थिती पाहता मान्सूनच्या पावसाच्या पुनरागमनाची कोणतीही शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली नाही. साधारणत: सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची पुनरागमन सुरू होते, मात्र त्यासाठी सध्या कोणतीही परिस्थिती दिसत नाही.
सप्टेंबर महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. आतापर्यंत राज्यात ऑगस्ट महिना कोरडाच राहिला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात सरासरी 207.1 मिमी पावसाच्या तुलनेत केवळ 86.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मात्र, जुलै महिन्यात महाराष्ट्रात चांगल्या पावसाची नोंद झाली. त्यामुळे राज्यात मान्सून सुरू झाल्यापासून राज्यात केवळ सात टक्केच पाऊस पडला आहे. राज्यात आतापर्यंत सरासरी 741.10 मिमी पावसाच्या तुलनेत 692.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात यंदा मान्सून चार दिवस उशिराने दाखल झाला.