Maharashtra Rain Updates : राज्यात काहीसा दिरंगाईनं पोहोचलेला मान्सून (Monsoon) आता बहुतांश जिल्ह्यांना व्यापताना दिसत आहे. विदर्भ, कोकणासह मध्य महाराष्ट्रातही पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. परिणामी शेतीच्या कामांना वेग आल्याचंही पाहायला मिळत आहे. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये पावसानं जोर धरलेला असतानाच जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मात्र पावसाची ये-जा पाहायला मिळाली. त्यातच सोमवार (3 जुलै 2023) रोजी मुंबई- उपनगरांमध्ये लख्ख सूर्यप्रकाशही पडला.
तिथं कोकणात मात्र परिस्थिती वेगळीच. किंबहुना मंगळवारचा दिवस उजाडला तो पावसाच्याच येण्यानं. मुंबई, पश्चिम उपनगरातील काही भाग आणि नवी मुंबईमध्ये मंगळवारी सकाळी पावसानं हजेरी लावली. ज्यामुळं नोकरी, शाळा आणि इतर कामांसाठी सकाळी घराबाहेर प़डलेल्यांची त्रेधातिरपीट उडाली.
सध्या सुरु असणारा पाऊस पाहता हवामान विभागानं (Konkan Rain) कोकण विभगाला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून, पुढील काही दिवस या भागांत मुसळधार पावसाची शक्यता असेल असा अंदाज वर्तवला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेधशाळेचे महासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 ते 5 दिवसांसाठी महाराष्ट्रातील कोकणासह गोव्यापर्यंत चांगल्या पर्जन्यमानाचा अंदाज आहे. तर, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भाहांत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊसही होऊ शकतो. सध्याच्या घडीला मान्सूनचं प्रमाण सरासरीहून कमी असलं तरीही धरण क्षेत्रांमध्ये झालेल्या पावसामुळं पाण्याची समस्या तूर्तास मिटताना दिसत आहे. त्यामुळं राज्यातील जनतेसाठी हा मोठा दिलासाच म्हणावा लागेल.
तिथं महाराष्ट्रात पावसानं चांगला जोर पकडलेला असतानाच आता देशभरातही मान्सून स्थिरावताना दिसत आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये केरळामध्ये पावसाची समाधानकारक हजेरी असेल. तर, सिक्कीम, लक्षद्वीप, पश्चिम बंगालचा काही भाग, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश या आणि अशा इतरही राज्यांमध्ये पावसाची हजेरी असेल.
गुजरातचा दक्षिण भाग, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, झारखंड, तामिळनाडू या भागांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल. तर, हिमाचल, उत्तराखंडमध्येही पावसाच्या तुरळक सरी बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.