प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी | बातमी आहे साईबाबंच्या (Shirdi Saibaba) शिर्डीतून. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाची सुरुवात ही साई बाबांच्या दर्शनाने व्हावी,या उद्देशाने अनेक साईबाबांचे भक्त हे शिर्डीला जातात. मात्र यंदा त्यांची ही इच्छा पूर्ण होणार नाही. (maharashtra shirdi saibaba temple will closed on 31 december decide sai sansthan due to corona restriction)
अनेक साईभक्त वर्षानुवर्ष नव्या वर्षाची सुरूवात बाबांच्या दर्शनानं करतात. साईभक्तांची ही सालाबादप्रमाणे ही परंपरा राहिली आहे. मात्र यंदा या भक्तांचा हिरमोड होणार आहे.
कारण 31 डिसेंबरच्या रात्री साईमंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी लागू केलीये. याला अनुसरून साईसंस्थाननं निर्णय घेतला आहे.
साईमंदिर 31 डिसेंबरला रात्री 9 वाजता बंद होईल. त्यामुळे रात्री साडेदहा वाजता होणारी शेजारती आणि पहाटे साडेचारला होणारी काकड आरतीही भक्तांशिवाय केली जाईल.
त्यामुळे 12 च्या ठोक्याला गाभाऱ्यात राहून साईदर्शनानं वर्ष सुरू करण्याची भाविकांची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार नाही. तसंच शिर्डीतील दुकानंही 9 वाजता बंद करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. व्यवसायावर परिणाम होणार असल्यानं विक्रेते नाराज झालेत.
या निर्णयावर भक्तांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्यात. काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
कोरोनामुळे दोन वर्ष मंदिर बंद होतं. आता मंदिर उघडलं असलं तरी दर्शनाचे तास कमी झालेत. त्यामुळे भक्तांना काहीसा दिलासा मिळालाय. मात्र नववर्षाचं स्वागत साईदर्शनानं करण्यासाठी 1 जानेवारीचा सूर्य उजाडण्याची वाट पाहावी लागेल.