कोरोना लसीचा तुटवडा, या ठिकाणी सर्व डोस संपल्याने लसीकरण बंद !

राज्यात (Maharashtra)  कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक होत असताना धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

Updated: Apr 8, 2021, 12:02 PM IST
कोरोना लसीचा तुटवडा, या ठिकाणी सर्व डोस संपल्याने लसीकरण बंद !
संग्रहित फोटो

मुंबई  / सातारा / पिंपरीचिंडवड : राज्यात (Maharashtra)  कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक होत असताना धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण ( Corona vaccine) मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी लसीचे डोस संपल्याने लसीकरण थांबविण्याची वेळ आरोग्य यंत्रणेवर आली आहे. लसीकरण केंद्रही बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे आता लसीचे डोस मिळाल्यानंतर पुन्हा लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सातारा येथील आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आला आली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड येथेही कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. आजचा दिवस कसाबसा जाईल, असे सांगण्यात येत आहे.

राज्यात सध्या केंद्र सरकारकडून होणाऱ्या कोरोना लसींच्या पुरवठ्याविषयी राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारमधील काही नेतेमंडळींकडून केंद्र सरकारकडे बोट दाखवले आहे. कोरोना लसींचा महाराष्ट्राला अपुरा पुरवठा होत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून हा आरोप फेटाळून लावला आहे.  दरम्यान, या  पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

साताऱ्यामध्ये लसीचे सर्व डोस संपले असून त्यामुळे लसीकरण बंद करण्यात आल्याची माहिती साताऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे. त्यामुळे आता साताऱ्यामध्ये लसीचा पुरवठा पुन्हा सुरु होईपर्यंत लसीकरण बंद राहणार आहे. राज्यात तीन दिवसांचाच लसीचा साठा शिल्लक, असल्याचे आधीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले होते.

साताऱ्यात व्यापक लसीकरण मोहीम

सातारा जिल्ह्यातील 45 वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्तींचे कोविड-19 लसीकरणाची मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्ये सुरु करण्यात आली. जास्तीत जास्त लोकांची नोंदणी आणि लसीकरण व्हावे यासाठी प्रशासनामार्फत व्यापक नियोजन करण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत सातारा जिल्ह्यात एकूण 2 लाख 56 हजार 434 एवढे लसीकरण पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत लसीचा साठा संपलेला असल्यामुळे उद्यापासून लसीचा साठा उपलब्ध होईपर्यंत लसीकरण मोहीम थांबवावी लागत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

पिंपरी चिंचवड एका दिवसाचे डोस शिल्लक

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेकडे आज दिवसभर पुरतील एवढेच कोरोना लसीचे डोस शिल्लक आहेत. शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर कोरोनावरील लशींचा तुटवडा जाणवू लागला आहे. महापालिकेकडे लसीचे फक्त 11 हजार डोस शिल्लक असून ते आज दिवसभरात संपतील, असे सांगण्यात आले आहे. लसीअभावी लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता असल्याने महापालिकेला लसीकरणही थांबवावे लागू शकते, अशी स्थिती दिसून येत आहे. आजपर्यंत 2 लाख 20 हजार 853 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.