Travel News : ट्रेकिंगच्या वाटांवर जाणाऱ्या मंडळींना साध्यासुध्या प्रवासामध्येही थरार शोधण्याची सवय असते. अशा मंडळींच्या आवडीची काही ठिकाणंही अतिशय कमाल असतात. अशाच ट्रेकिंगकडे कल असणाऱ्या अनेकांच्याच आवडीचं आणि त्यांना अपेक्षित थराराचा अनुभव देणारं एक ठिकाण मुंबईपासून अवघ्या काही तासांच्यात अंतरावर आहे. अगदी एका दिवसात तुम्ही तिथं जाऊन परतू शकता. हो, पण तिथं जात असताना तयारीनिशी जाणं उत्तम, कारण संकटं सांगून येत नाहीत.
2300 फुटांची उभी चढाई, सुळक्याहून खाली पाहिलं असता उडणारा थरकाप आणि निसर्गाच्या अगाध लीलेचं दर्शन घडवून आणणारं हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील कलावंतीण किल्ला. दिवस उगवतो तेव्हा सूर्याच्या पहिल्या किरणांनी न्हाऊन निघणारा हा कलावंतीण दुर्ग मावळतीच्या सूर्यकिरणांमध्येही तितकाच कमाल दिसतो. पण, रात्रीचा किर्रss काळोख मात्र इथं असणाऱ्यांना धडकी भरवतो. म्हणूनच की काय, इथं आलं असता अंधार पडायच्या आत परतण्यातच शहाणपण.
असं म्हणतात की, या किल्ल्यावरून कोसळून अनेकांचा मृत्यू ओढावला आहे. अशा या किल्ल्याचं आधीचं नाव मुरंजन. पण, छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं नाव बदलत त्याला राणी कलावंती यांच्या नावावरून नवी ओळख दिली.
पनवेल- माथेरानमध्ये असणाऱ्या या किल्ल्यावर ट्रेकिंगचा अनुभव असणाऱ्यांचा राबता असतो. हा गड चढत असताना त्यावर असणाऱ्या दगडी पायऱ्या काळजाचा ठोका चुकवतात. कोणत्याही आधाराशिवाय दगडात कोरलेल्या या पायऱ्या चढत असताना एक लहानशी चूक तुम्हाला मृत्यूच्या दाढेत ढकलू शकते. पण, ही अवघड वाट सर करून पुढं पोहोचलं असता गडावरून दिसणारं दृश्य सारा क्षीण दूर करतं. कलावंतीण किल्ल्यावरून माथेरान, चंदेरी, कर्नाळा आणि इरशाळगड अगदी स्पष्टपणे दिसतो. इतकंच नव्हे, तर मुंबईतील काही ठिकाणंही इथं दिसतात.
कलावंतीण दुर्गाच्या पायथ्याशी असणाऱ्या ठाकुरवाडी गावातून या ट्रेकची सुरुवात होते. मुंबईहून पनवेलला येण्यासाठी ट्रेन किंवा बसचा पर्याय उपलब्ध असून, तिथून पुढं या गावात पोहोचण्यासाठी रिक्षाची सेवा उपलब्ध आहे. कलावंतीण दुर्गापर्यंत पोहोचण्यापूर्वी लागणाऱ्या प्रबळ माचीवर हल्ली कॅम्पिंगची सुविधाही असल्यामुळं बरेच ट्रेकर्स इथं राहण्याचा पर्याय निवडतात. साधारण मे ते सप्टेंबर या दरम्यान किल्ल्यावर न जाण्याचा सल्ला जाणकार आणि अनुभवी ट्रेकर्स देतात. उन्हाळ्याच सूर्याची तीव्र किरणं आणि पावसाळ्यादरम्यानची निसरडी वाट अधिक धोक्याची असल्यामुळं कलावंतीण दुर्गावर यादरम्यान न येणं फायद्याचं. तर, ऑक्टोबर ते मार्चदरम्यान इथं येऊन ट्रेकिंगचा थरारक अनुभव तुम्ही घेऊ शकता. सोबत अनुभवी वाटाड्या आणि मार्गदर्शक असल्यास या वाटेसंबंधी मनात असणारी भीती कमी करुन तुम्हाला ट्रेकिंगचा आनंद द्विगुणीत करता येईल.